पुण्यात सोमवारपासून एक दिवसाआड पाणी

पुणे, ता. ३०/०६/२०२२: धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने अखेर पुणे महापालिका प्रशासनाने पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून (ता. ४) शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यापूर्वी प्रशासनाकडून पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.

खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाल्याने महापालिकेने पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे पत्र जलसंपदा विभागाने महापालिकेला पाठविले होते. पुण्याकडे व धरण क्षेत्रात अद्याप पावसाला सुरवात झालेली नाही, चारीही धरणात मिळून केवळ अडीच टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाऊस लांबणीवर पडला तर स्थिती आणखी चिंताजनक होण्याची शक्यता आहे. यापार्श्‍वभूमीवर पाणी पुरवठ्याची तीन दिवसांपूर्वी बैठक होणार होती, पण ही बैठक रद्द झाल्याने निर्णय लांबणीवर पडला होता.

पुण्यात आधीच असमान पाणी पुरवठा होत आहे. सध्या काही भागात दिवसभर पाणी असते तर बहुतांश भागात दिवसातून एक वेळच पाणी मिळते.  त्यामुळे तेथे पाणी कपात केली तर कमी दाबाने पाणी पुरवठा होऊन नागरिकांना पाणीच मिळणार नाही अशी स्थिती उद्भवत असल्याचे यापूर्वीच्या पाणी कपातीमधून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पाणी कपातीनंतरही पूर्ण दाबाने पाणी मिळावे यासाठी एक दिवसाआड पाणी कपात केली जाते. यंदाही पाणी कपात करण्याचा निर्णय झाल्यास त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने नियोजन करणे सुरू केले आहे.

यासंदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज (ता. ३०) पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कशा पद्धतीने नियोजन केले आहे याचा आढावा घेतला. पुण्यातील पाणी पुरवठ्याची यंत्रणा पाहता पाणी कपात करताना एक दिवसाआड पाणी देणेच शक्य आहे. त्यामुळे त्याचे वेळापत्रक जाहीर करून सोमवारपासून अंमलबजावणी करावी अशी चर्चा बैठकीत झाली आहे, अशी माहिती आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली