पुणे: हांडे वाडी रस्त्यावर पीएमपी चालकाचा निघृण खून

पुणे, ११/०७/२०२१: शहरातील एका पीएमपीएल चालकाला रस्त्यात गाठून  निघृण खून केल्याची धक्कादायक घटना  हांडेवाडी परिसरातील मोकळ्या जागेत घडली आहे. खुनाचा प्रकार रविवारी दुपारी उघडकीस आला. घटनेची माहिती मिळातच कोंढवा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

गौतम मच्छिंद्र साळुंखे ( वय 29, रा. पापडेवस्ती, ढमाळवाडी, फुरसुंगी) असे खून झालेल्या तरूण चालकाचे नाव आहे.

गौतम गेल्या अडीच वर्षापासून पीएमपीएलमध्ये चालक म्हणून नोकरीस आहेत. शनिवारी त्यांना दुपारपाळी असल्याने  कामासाठी दुचाकी घेऊन घराबाहेर पडले होते. स्वारगेट ते धायरी मार्गावर बस चालवून त्यांनी दिवसभर काम केल्यानंतर रात्री पावणे दहाच्या सुमारास स्वारगेट डेपोत बस लावली. त्यानंतर  घरी जाण्यासाठी ते बाहेर पडले. परंतु, रविवारची सकाळ उजाडल्यानंतरहीघरी न परतल्याने त्यांचे सासर्‍यांनी स्वारगेट डेपोत जाऊन गौतम बाबत चौकशी केली. परंतु, तेथे त्यांना रात्रीच गौतम ड्युटी संपून गाडी डेपोत लावून घरी गेल्याचे समजले. परंतु, गौतम दिवसभर घरीच न आल्याने त्यांनी इतर विचारपूस केली.

शेवटी त्यांना चार वाजण्याच्या सुमारास गौतमचा खून करून त्याचा चेहरा दगडाने विद्रुप करून मृतदेह हांडेवाडी परिसरातील मोकळ्या जागेत टाकून दिल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. गौतमचे सात वर्षापूर्वीच लग्न झाले असून त्याला सव्वा वर्षाची मुलगी आहे. ते सासर्‍यांकडेच रहायला होता. दरम्यान पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून खुनाचे कारण समजू शकले नाही.