पीएमपीएमएल कडून१८ एप्रिल रोजी “बस डे” उपक्रमाचे आयोजन, प्रवाशी नागरिकांसाठी लकी ड्रॉ

पुणे, १७/०४/२०२२: पुणे महानगर परिवहन महामंडळाचा १५ वा वर्धापन दिन दि. १९ एप्रिल २०२२ रोजी असून त्यानिमित्त परिवहन महामंडळाकडून “बस डे” या महत्वपूर्ण उपक्रमासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

 

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी पीएमपीएमएलच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त वापर करून वाहतूक कोंडी व प्रदूषण कमी करण्यास हातभार लावावा या उद्देशाने दि. १८ एप्रिल २०२२ रोजी बस डे या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. दर्जेदार प्रवाशी सेवा देण्यास पीएमपीएमएल सक्षम, तत्पर व कटिबद्ध आहे तरी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी पीएमपीएमएलच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त वापर करावा असे आवाहन पीएमपीएमएल या निमित्ताने करत आहे.

 

बस डे व वर्धापन दिनानिमित्त प्रवाशी नागरिकांसाठी सुविधा व सवलतीच्या दरातील सेवा खालील प्रमाणे

 

१)     दि. १८ एप्रिल २०२२ रोजी बस डे दिवशी १८०० बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी मार्गावर संचलनात राहणार आहेत.

 

२)     “बस डे” उपक्रमानिमित्त दि. १८ एप्रिल २०२२ रोजी पुणे शहरामध्ये कोथरूड डेपो ते डेक्कन, स्वारगेट ते वडगांव धायरी फाटा, स्वारगेट ते शिवाजीनगर (बाजीराव/शिवाजी रोड मार्गे), जंगली महाराज रोड, फर्ग्युसन कॉलेज रोड या ५ मार्गांवर पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली व स्वयंसेवकांच्या सहकार्याने डेडिकेटेड लेनद्वारे प्रवाशी सेवा दिली जाणार आहे.

 

३)     दि. १९ एप्रिल २०२२ रोजी पीएमपीएमएल चा वर्धापन दिन असल्याने पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका   हद्दीतील प्रवाशांसाठी सवलतीच्या दरात किमान तिकीट दर ५ रूपये व कमाल तिकीट दर १० रूपये इतका राहील. तसेच पुण्यदशम बससेवा पूर्ण दिवस मोफत राहील. (दोन्ही महानगरपालिका हद्दीबाहेरील चालू तिकीट दरात कोणताही बदल होणार नाही.)

 

४)     दि. २० एप्रिल २०२२ रोजी पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीमध्ये महिला प्रवाशांसाठी सवलतीच्या दरात

 

दैनिक पास १० रूपये मध्ये संपूर्ण दिवस प्रवास करता येईल. (महानगरपालिका हद्दीबाहेर कोणतीही सवलत राहणार नाही.)

 

 

बस डे निमित्त प्रवाशांसाठी लकी ड्रॉ

 

बस डे दिवशी पीएमपीएमएल मार्फत देण्यात येणाऱ्या सेवा व सुविधांची माहिती होणेचे दृष्टीने बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशास पीएमपीएमएल कडून माहिती पत्रक देण्यात येणार असून त्यामध्ये लकी कुपन असणार आहे. प्रवाशांनी कुपनमध्ये स्वतःचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर व पीएमपीएमएल सेवेबाबतचा अभिप्राय नमूद करावयाचा आहे. सदरचे कुपन प्रत्येक बस व बसस्थानकामध्ये ठेवलेल्या बॉक्स मध्ये जमा करावयाचे आहे. जमा होणाऱ्या कुपनांमधून लकी ड्रॉ काढून विजेत्या प्रवाशांना आकर्षक बक्षीसे दिली जाणार आहेत.

बस डे व वर्धापन दिनानिमित्त क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

 

Ø  दि. १४ ते १६ एप्रिल २०२२ : पीएमपीएमएलच्या डेपो अंतर्गत क्रिकेट व कबड्डी स्पर्धा

 

Ø  दि. १८ एप्रिल २०२२ : बस डे (१८०० बसेस संचलनात आणून नागरिकांना पीएमपीएमएलच्या बस सेवेचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले जाणार आहे.)

 

Ø  दि. १९ एप्रिल २०२२ : वर्धापन दिन व क्रिकेट, कबड्डी स्पर्धांचे बक्षिस वितरण.

 

Ø  दि. २० एप्रिल २०२२ : महिला कर्मचाऱ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम व विविध खेळांचे आयोजन

 

Ø  दि. २१ एप्रिल २०२२ : सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर ट्रान्सपोर्टेशन अँड अर्बन प्लॅनिंग : फेलोशिप अनाऊन्समेंट

 

सहभाग : सीओईपी, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, आयटीडीपी, एसटीपीआय, सिंबायोसिस कॉलेज

 

Ø  दि. २२ एप्रिल २०२२ : एक्झिबिशन ऑन व्हील्स (प्रदर्शन बस तयार करून प्रत्येक बससेवेची माहिती लोकांपर्यंत पोहोचविणे.)

 

Ø  दि. २३ एप्रिल २०२२ : वेबिनार व पॅनेल डिस्कशन (वाहतूक तज्ञ, एनजीओ, प्रवासी मंच, ज्येष्ठ नागरीक यांच्यासोबत परिसंवादाचे आयोजन)