पीएमपीएमएलतर्फे ‘मी पीएमपीएमएलचा प्रवासी’ स्पर्धेचे आयोजन

पुणे, २८ जून २०२२ : पुणे व पिंपरी चिंचवड शहरांमधील सार्वजनिक वाहतुकीची लाईफलाईन असलेल्या पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थात

पीएमपीएमएलतर्फे प्रवाशांमध्ये एक दृढ नाते आणखी घट्ट व्हावे व प्रवाशांशी असलेला सुसंवाद वाढावा यासाठी ‘मी पीएमपीएमएलचा प्रवासी’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या संकल्पनेतून आयोजित ही स्पर्धा १ ते ३१ जुलै २०२२ या दरम्यान होणार आहे. उत्कृष्ठ लेख, उत्कृष्ठ कविता, उत्कृष्ठ फोटो, उत्कृष्ठ व्हिडिओ अशा चार प्रकारात ही स्पर्धा होणार आहे.
या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या स्पर्धकांना १ वर्ष सर्व मार्गाकरिता मोफत प्रवासाकरिता बस पास दिला जाईल. द्वितीय बक्षीस म्हणून ६ महिने सर्व मार्गाकरिता मोफत प्रवासांकरिता बस पास व तृतीय बक्षीस ३ महिने सर्व मार्गाकरिता मोफत प्रवासाकरिता बस पास बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत. सदर स्पर्धेत ‘ऑनलाईन व ऑफलाईन’ पद्धतीने सहभाग नोंदवता येणार आहे.
स्पर्धेत ऑनलाईन सहभागासाठी नागरिक pmpmlcontest@gmail.com या ई-मेल वरती व ९०११०३८१४९ या  व्हॉटस्अॅप क्रमांका वरती लेख, कविता, फोटो व व्हिडीओ पाठवून सहभाग घेऊ शकतील.
ज्या प्रवाशांकडे स्मार्ट फोन नाही अशा प्रवाशांनी त्यांचे लेख / कविता अथवा फोटो मा. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, यांचे नांवे परिवहन महामंडळाच्या सर्व मुख्य स्थानकांवर ठेवण्यात येणाऱ्या पेटी मध्ये प्रवासी आपली प्रवेशिका १ ते ३१ जुलै २०२२ दरम्यान जमा करावी. तसेच सर्व बस मध्ये स्पर्धेचे माहिती पत्रक लावण्यात येणार असून त्यावरती ऑनलाईन व्हॉटस्अॅप क्युआर कोड असणार आहे.तो ऑनलाईन व्हॉटस्अॅप क्युआर कोड स्कॅन करून लेख, कविता, फोटो व व्हिडिओ पाठवू शकणार आहेत.
या स्पर्धेमध्ये शाळा व कॉलेजचे विद्यार्थी तसेच संस्थांचे प्रतिनिधी एकत्रित यामध्ये सहभाग नोंदवू शकतात. स्पर्धेबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार स्वतंत्रपणे नेमलेल्या निवड समितीमार्फत होणार असून ते उत्कृष्ठ स्पर्धकांची निवड करणार आहेत.
या स्पर्धेमुळे प्रवासी संख्या वाढण्यास तसेच प्रवाशांचे अनुभव समजून सुसंवाद वाढविण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जास्तीत प्रवाशांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.