पुणे: मेट्रोला पीएमपीएमएलची साथ; मेट्रो मार्गावरील स्थानाकादरम्यान धावणार मिडी बस

पुणे, 14 जून 2021: पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये वनाज ते रामवाडीपिंपरी ते दापोडी या मार्गावर मेट्रो धावणार असून तथापि, पहिल्या टप्प्यामध्ये 11.00 कि.मी. मेट्रोचे काम पूर्ण होणार असून पहिल्या टप्प्यामध्ये पिंपरी ते फुगेवाडी या दरम्यान 6.2 कि.मी.वनाज ते गरवारे महाविद्यालय या दरम्यान मेट्रो धावणार आहे. या दोन्ही टप्प्यामध्ये अनुक्रमे पिंपरीतील संत तुकाराम नगर, भोसरी, कासारवाडी आणि फुगेवाडी तसेच वनाज, आनंदनगर आणि गरवारे महाविद्यालय ही स्थानके असून पी.एम.पी.एम.एल.मार्फत मेट्रोकरीता वरील स्थानकांवर पी.एम.पी.एम.एल.च्या मिडी बसेस फिडर रूट म्हणुन धावणार आहे. 

 

पुणे व पिंपरी-चिंचवड मेट्रो करीता एकुण नियोजित 30 मेट्रो स्टेशन असून त्यावर पी.एम.पी.एम.एल.मार्फत युएमटीसीने नियोजित केलेल्या फिडर रूटवर संचलन होणार आहे. सदर मेट्रो स्टेशनकरीता एकुण 25 सक्युर्लर रूट असून सदर मार्गाची एकुण लांबी 156 कि.मी. आहेसरासरी लांबी 6.2 कि.मी. आहे. सदर मार्गांकरीता प्रस्तावित नियोजनानुसार 300 बसेस लागणार असून मेट्रोचा विस्तारीकरणा नंतर 400 बसेसची आवश्यकता राहणार आहे. सदर मेट्रो स्टेशनमध्ये मुख्य टर्मिनल व काही ट्रान्सफर स्टेशन, एअरपोर्ट शटल सेवा करीता महामंडळाने मेट्रो सोबत मिटींग घेऊन एकमेकांशी स्पर्धा न करता, सहकार्य करण्याच्या उद्देशाने धोरणात्मक चर्चा करून पी.एम.पी.एम.एल.सोबत आवश्यक खालील बाबींबाबत नियोजन केले आहे. 

 

टर्मिनल व ट्रान्सफर स्टेशनकरीता या करीता स्वतंत्र पार्कींगची जागा तसेच बस-बे ची आवश्यकता असून सदर टर्मिनल हे मेट्रो स्टेशनचे एंट्री व एक्झीट जवळ असणे आवश्यक आहे. जेणेकरून प्रवासी सुरक्षितता व सुलभता चांगल्या दर्जाची असेल. सदर स्टेशनवरून प्रवाशांच्या मागणीनुसार विविध मार्ग असणार आहे. तसेच सदर टर्मिनलवर बसेसच्या/मेट्रोच्या मार्गांचे वेळापत्रक, इलेक्ट्रोनिक माध्यमातुन डिस्प्ले करणे आवश्यक राहणार आहे. 

 

ट्रान्सफर स्टेशन

पी.एम.पी.एम.एल. व मेट्रो या दरम्यान खालील प्रमाणे ट्रान्सफर स्टेशन आहेत.

 1. कासारवाडी (भोसरी):- सदर ट्रान्सफर स्टेशन हे रेल्वेतील प्रवासी, भोसरी, राजगुरूनगर कडे जाणारे प्रवासी यांचेकरीता महत्वाचे भोसरी ट्रान्सफर स्टेशन असून येथुन रेल्वे स्टेशन सलंग्न असल्याने विविध भागातुन येणारे रेल्वे प्रवासी हे मेट्रोचा उपयोग करणार आहेत. तसेच भोसरी, राजगुरूनगर या भागातील प्रवासी मेट्रोचा उपयोग सदर स्टेशनवरून करणार असल्याने बसेसची मागणी मोठ्या प्रमाणात राहणार असून त्यामुळे मेट्रो स्टेशनलगत बस टर्मिनलसाठी दोन्ही बाजुला किमान 2 बसेसची जागा आवश्यकता आहे. सध्या एका बाजुला टर्मिनल करीता कमी जागा उपलब्ध असल्याचे नियोजनात दिसुन येते.
 2. डेक्कन :- सदर स्थानक हे वनाज ते रामवाडी या दरम्यान मुख्य ट्रान्सफर स्टेशन असून विविध शैक्षणिक संस्था व व्यापारी भाग असून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात चढ-उतार होणार असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून सदर स्थानकातुन पी.एम.पी.एम.एल.च्या बस स्थानकामध्ये प्रवाशांना जाण्याकरीता पादचारी रस्ता करण्याबाबत पुणे मेट्रोस नियोजन करण्याबाबत कळविले आहे.
 3. म.न.पा. (शिवाजीनगर):- सदर स्टेशनमधुन नियोजित तीन मेट्रो मार्ग जाणार आहेत. त्यामुळे सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवासी चढ-उतार होणार आहे. तसेच पी.एम.पी.एम.एल.च्या म.न.पा. मुख्य स्थानकाशी सलंग्न असे हे ट्रान्सफर स्टेशन होणार आहे. सद्याचे पी.एम.पी.एम.एल.चे म.न.पा. स्थानक हे या ठिकाणी स्थलांतरीत करण्याचे नियोजन आहे.  त्यामुळे सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतुक होणार असल्याने किमान 350 बसेसचे संचलन सुरक्षितपणे होण्यासाठी सदर ठिकाणी पी.एम.पी.एम.एल.ला नियोजित विकसन आराखड्यामध्ये जागा देण्याबाबत चर्चा झालेली आहे. 
 4. रामवाडीः- सदर ट्रान्सफर स्टेशन हे पुणे विमानतळाच्या 1.5 कि.मी. जवळ असून या ठिकाणी पुणे एअरपोर्ट ते रामवाडी अशी शटल सेवा पी.एम.पी.एम.एल.मार्फत देण्यात येणार आहे. वनाज ते रामवाडी असा नियोजित मेट्रो मार्ग असून सदर मार्ग हा रामवाडी येथुन सुरू होत असल्याने सदर ठिकाणी प्रवाशी व एअरपोर्ट प्रवासी यांचा चढ-उतार मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे सदर ठिकाणी बसेस संचलनास जागा देण्याबाबत पुणे मेट्रो यांचेशी चर्चा झाली असून मेट्रो स्टेशनच्या दोन्ही बाजुस किमान दोन ते चार बसेस उभ्या करण्याऐवढी जागा/बस बे पी.एम.पी.एम.एल.ला देणेबाबत नियोजन करण्याबाबत मिटींगमध्ये चर्चा झाली आहे.  

 

टर्मिनल स्टेशन

 1. वनाजः- सदर टर्मिनल वरून वनाज ते रामवाडी हा मार्ग सुरू होणार आहे. त्यामुळे सदर मार्गावरून किमान प्रत्येक 2 ते 5 मि. एक मेट्रो धावणार असून किमान 200 ते 300 प्रवासी त्यामध्ये असतील असे नियोजनात असून त्याकरीता आवश्यक प्रवासी वाहतुकीचे नियोजन युएमटीसीमार्फत पुणे मेट्रोने केले असून त्यानुसार बस वाहतुक संचलन करणार आहे. सदर संचलनास मोठ्या प्रमाणात बसेसची आवश्यकता राहणार आहे. तसेच सदर आवश्यक बसेसच्या थांब्याकरीता दोन्ही बाजुस किमान 2 ते 4 बसेससाठी बस बेची आवश्यकता असल्याचे मेट्रोस कळविण्यात आले आहे.
 2. एअरपोर्टः- एअरपोर्टमधुन येणाऱ्या प्रवाशांकरीता मेट्रो शटल सर्व्हीस पी.एम.पी.एम.एल.मार्फत देण्यात येणार आहे. याकरीता पुणे एअरपोर्टमध्ये व नियोजित एअरपोर्ट टर्मिनलमध्ये स्वतंत्र जागा देणेबाबत एअरपोर्ट अॅथोरिटी व पुणे मेट्रोस कळविण्यात आलेले आहे. 
 3. पिंपरीः- पिंपरी ते स्वारगेट असा मेट्रो मार्ग असून हा मार्ग पिंपरी येथुन सुरू होत आहे. पिंपरी हे पिंपरी-चिंचवड मधील मुख्य व्यापारी भाग असून पिंपरी-चिंचवड मधील विविध भागातील प्रवासी येथे खरेदीसाठी येतात. त्यामुळे यामुख्य स्थानकावर बस संख्या मोठ्या प्रमाणात असणार असून त्यानुसार सक्र्युलर मार्ग तसेच विविध पी.एम.पी.एम.एल.चे बस मार्ग असून सदर टर्मिनलवर त्याकरीता आवश्यक बस बेचे नियोजन करण्याबाबत मेट्रो यांचेशी चर्चा करण्यात आलेली आहे.
 4. स्वारगेट:- सदर ट्रान्सफर स्टेशन हे पी.एम.पी.एम.एल.पूर्व स्थानक व एस.टी.महामंडळ पूर्व डेपो व म.न.पा.वॉटर स्टेशन या सर्व जागेंचे एकत्रित स्टेशन करण्यात येणार असून सदर ट्रान्सफर स्टेशनमधुन एस.टी.चे प्रवासी व पी.एम.पी.एम.एल.चे प्रवासी मेट्रो सर्व्हिसचा उपयोग सहजपणे करणार असून त्यानुसार प्रवासी ट्रान्सफरचे नियोजन केले आहे. तसेच पी.एम.पी.एम.एल.ला किमान 50 बसेससाठी नियोजित स्थानक करण्यात येणार आहे. या स्थानकामध्ये बस चार्जिंग, बस स्वच्छता (धुणे), किरकोळ दुरूस्ती इत्यादीची व्यवस्थेचे नियोजन करण्याबाबत मेट्रोशी चर्चा केली आहे. 

 

माहिती तंत्रज्ञान

 1. डिस्प्ले बोर्ड:- पुणे मेट्रो व पी.एम.पी.एम.एल.हे विविध मार्गांसाठी असणारे मार्ग व फिडर रूट यांचे आयटीएमएसद्वारे माहिती एकत्रित करून प्रवाशांच्या आवश्यकतेनुसार सदर माहिती ही प्रवाशांना एलईडी बोर्डद्वारे डिस्प्ले करणार आहे. यामध्ये प्रवाशांना येणारी बस/मेट्रोची अचुक वेळ तसेच बस/मेट्रोचा मार्ग यांची माहिती व वेळ डिस्प्ले बोर्डवर प्रदर्शित करणार असल्याने प्रवाशांना सुलभपणे प्रवास शक्य होणार आहे. 
 2. इंटरचेंजबल पेमेंट मोडः- यामध्ये पी.एम.पी.एम.एल.कडील पेमेंट कार्ड हे पी.एम.पी.एम.एल.मध्ये व मेट्रोमध्ये  प्रवासासाठी ग्राह्य धरण्यात येईल तसेच मेट्रोचे पेमेंट कार्ड मेट्रो प्रवास व पी.एम.पी.एम.एल.प्रवासासाठी ग्राह्य धरण्यात येईल असे नियोजन करण्याचे दोन्ही संस्थाचे प्रयोजन आहे. 
 3. प्रवासी अॅप :- पी.एम.पी.एम.एल.व मेट्रो यांचे एकत्रित अॅप प्रवाशांच्या सोईसाठी विकसीत करण्यात येणार असून यामध्ये प्रवाशांना मेट्रो/बसची व  फिडर बसेसची अचुक वेळ त्याची वारंवारीता तसेच प्रवासासाठी आवश्यक आरक्षण (तिकीट) चे पेमेंट या अॅपद्वारे ऑनलाईन पेमेंट करता येईल. तसेच यामधील जर्नी प्लॅनर याद्वारे प्रवासी इच्छित स्थळी जाण्यासाठीचे विविध पर्याय निवडु शकतील व प्रवासी एकाच प्रवासासाठी एकाच तिकीटामधुन पी.एम.पी.एम.एल. व मेट्रोचा एकत्रित प्रवास सहजपणे करू शकेल असे नियोजन करण्यात येणार आहे. 

 

वरील प्रमाणे मेट्रो व पी.एम.पी.एम.एल.हे एकमेकांशी स्पर्धा न करता एकमेकांस सहकार्य करणेकामी दोन्ही     संस्थाच्या  4 मिटींग्स झाल्या असून वरील प्रमाणे नियोजन करण्यात येत आहे.