पुणे, १६ एप्रिल २०२५: पुणे शहरात विविध चोरीच्या घटना उघडकीस येत असतात, पण यंदाचा प्रकार धक्कादायक आहे. झारखंडवरून आलेल्या चोरांच्या टोळीकडून वाकडेवाडी परिसरात पेट्रोल पंप लुटण्याचा प्लॅन आखण्यात आला होता, पण पोलिसांनी वेळेवर कारवाई करून हा प्लॅन उधळून लावला आहे.
पुण्यातील पेट्रोल पंप लुटण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. खडकी पोलिसांनी या प्रकरणी ९ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ३० पेक्षा जास्त मोबाईल जप्त केले आहेत.
माहितीनुसार, खडकी पोलिसांना वाकडेवाडी येथील जुना पुणे-मुंबई हायवेवरील भारत पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीबाबत माहिती मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकून पाठलाग केला आणि एकूण ६ आरोपींना ताब्यात घेतले, तर ३ आरोपी पळून गेले होते. तपासात सुमारे ८ लाख रुपयांच्या किमतीचे ३० मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. अटक केलेल्या आरोपींनी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि इतर शहरांमध्ये मोबाईल चोरी आणि जबरी चोरी केल्याची कबुली दिली आहे.
पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी सांगितले की, १४ एप्रिल रोजी भीम जयंतीच्या बंदोबस्तादरम्यान खडकी पोलिसांना वाकडेवाडी येथील मुंबई-पुणे रस्त्यावर काही संशयित व्यक्ती थांबले असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तिथे जाऊन विचारपूस केली असता ते लोक पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले, पण पोलिसांनी पाठलाग करून ६ जणांना अटक केली. हे आरोपी बिहार आणि झारखंड येथील असून त्यांनी पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा प्लॅन आखला होता. दुसऱ्या दिवशी आणखी ३ आरोपींना ताब्यात घेतले गेले. हे आरोपी १० एप्रिल रोजी पुण्यात आले होते आणि शहरातील विविध भागांत मोबाईल चोरीसह जबरी चोरी केल्याचा तपास सुरू आहे.
More Stories
Pune: मेधा ताई तुमच्या बापाचा शनिवारवाडा नाही – रुपाली ठोंबरे पाटील
Pune: जैन बोर्डिंग जागा विक्रीव्यवहार प्रकरणाला जैसे थे ठेवण्याचे आदेश
Pune: पहिला ‘खासदार क्रीडा महोत्सव’ रंगणार २ ते १६ नोव्हेंबरदरम्यान