पुणे शहरात रविवारपासून पल्स पोलिओ मोहिम 

पुणे, २६/०२/२०२२: पुणे महापालिकेतर्फे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम २७ फेब्रुवारी २०२२ पासुन राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत ० ते ५ वर्ष वयोगटातील सर्व लाभार्थ्यांना पोलिओ डोस देणे बंधनकारक आहे. या वर्षी सदर मोहिम एकाच सत्रात राबविण्यात येणार आहे.

 

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम-२०२२ ची आढावा बैठक नुकतीच

महापालिका आयुक्त कार्यालयात झाली. आरोग्य प्रमुख डाॅ. आशिष भारती ,सहाय्यक आरोग्य अधिकारी (राष्ट्रीय कार्यक्रम) डॉ. वैशाली जाधव लसीकरण अधिकारी डॉ. सुर्यकांत देवकर, नोडल अधिकारी (NUHM विभाग)डॉ.राजेश दिघे, बाल विकास प्रकल्प अधिकारी व अंगणवाडी पर्यवेक्षक आदी उपस्थित होते.

 

पुणे महापालिका कार्यक्षेत्रात सर्व प्रभागनिहाय एकूण १४०० पोलिओ बूथ आयोजित करण्यात आले आहेत. या मोहिमेमध्ये ० ते ५ वर्ष वयोगटातील अपेक्षित ३,११,००० लाभार्थीना पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट आहे. सर्व प्रभागनिहाय पाच दिवस आय.पी.पी.आय. कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच रेल्वेस्थानक, बस स्थानक, उद्याने, महामार्ग इत्यादी ठिकाणी विशेष बुथ कार्यरत राहणार आहे. या मोहिमेसाठी ४०५५ स्वयंसेवक ,२८० पर्यवेक्षक, १५ मुख्य पर्यवेक्षक, तसेच पुणे महापालिकेचे ९० डॉक्टर्स, ५ विभागीय अधिकारी, पुणे महानगरपालिकेच्या नर्सेस व इतर कर्मचारी व्यतिरिक्त खाजगी डॉक्टर्स, अंगणवाडी सेविका, रोटरीयन्स, नर्सेस कॉलेजचे विदयार्थी यांचा सहभाग घेण्यात येणार आहे. तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी व्यतिरीक्त महिला बालविकास प्रकल्पातंर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस, स्वयंसेवक, आशावकर यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.

 

पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील वीटभट्ट्या, स्थलांतरीत वस्त्या, बांधकाम सुरु असलेली ठिकाणे अशा जोखमीच्या भागातील बालकांना लस देणेकरीता विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. मोहिमेचे योग्य नियोजन करून लसीकरण कार्यक्रम यशस्वी करण्याच्या सूचना मा. आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती,

आरोग्य अधिकारी, पुणे महानगरपालिका यांनी दिल्या आहेत.

 

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम-२०२२ अंतर्गत ० ते ५ वर्ष वायोगटातील बालकांना पोलिओ डोस देऊन ही मोहीम यशस्वी करावी व एकही बालक पोलिओ डोस पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ, आयुक्त विक्रम कुमार , पुणे महानगरपालिका यांनी केले आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम-२०२२ मध्ये ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ लसीचे २ थेंब देऊन मोहिम १००% यशस्वी करण्याचे आवाहन नागरीकांना केले आहे.