पुणे: शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपतीला ५०० डाळिंबांचा नैवेद्य व पुष्प सजावट

पुणे, १४ जून २०२१: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त गणरायासमोर सुमारे ५०० डाळिंबांचा नैवेद्य दाखविण्यात आला तसेच शेषनागाच्या प्रतिकृतीची आकर्षक पुष्पसजावट करण्यात आली.
गणेश जयंतीनिमित्त मंदिरात सोमवारी सकाळी ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले.

ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले,” श्रीशेष ध्यान करत असतांना त्यांच्या ध्यानातूनच भगवान श्री गणेश श्रीशेषात्मज रूपात ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला मध्यान्य समयी प्रकट झाले. याच अवतारात पुढे गजासुर नामक राक्षसाला मारण्यासाठी भगवान श्री गणेशांनी ब्रह्मदेव, विष्णू, शंकर ,देवी, सूर्य या पंचेश्वरांच्या शक्तिने युक्त असलेले मूषक हे वाहन त्यांना करायला सांगितले. या मूषकावर बसून श्री गणेशांनी गजासुर वध केल्यामुळे याच श्रीशेषात्मज अवताराला श्रीमूषकग असे पण नाव प्राप्त झाले. गाणपत्य संप्रदायात भाद्रपद आणि माघ मासाप्रमाणेच ज्येष्ठ चतुर्थीचाही श्रीशेषात्मज जन्मोत्सव महत्वपूर्ण मानलेला आहे.”

करोनामुळे मंदिर दर्शनासाठी बंद आहेत. मात्र भक्तांकरीता घरबसल्या दर्शनाची सोय ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS: http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी आॅनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.