पूना क्लब गोल्फ कोर्सचे सदस्य अनिर्बन लाहेरी व उदयन माने टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र

पुणे, 14 जुलै 2021:अनिर्बन लाहेरी आणि उदयन माने हे भारतातील अग्रगण्य गोल्फपटू आगामी टोकियो ऑलिंपिक 2020 या स्पर्धेतील पुरुषांच्या गोल्फ प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाले आहेत. हे दोन्ही खेळाडू पूना क्लब गोल्फ कोर्सचे सक्रिय सदस्य आहेत.
टोकियो ऑलिंपिकमधील 60 खेळाडूंचा समावेश असलेल्या गोल्फ स्पर्धेत 30 वर्षीय उदयन माने आणि भारतातील अव्वल खेळाडू अनिर्बन लाहेरी हे भारताचे आव्हान पेलणार आहेत. उदयन माने याचा आज पूना क्लब गोल्फ कोर्स येथे पूना क्लबचे अध्यक्ष नितीन देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पूना क्लब गोल्फ कोर्सचे कॅप्टन ललित चिंचनकर, महिला कॅप्टन पदमजा शिर्के, पूना क्लबचे उपाध्यक्ष सुनील हांडा , तसेच कार्यकारिणी समितीचे सदस्य गौरव गढोके व ईक्रम खान आदी मान्यवर उपस्थित होते.
सध्या भारतात द्वितीय मानांकित असलेल्या आणि जागतिक क्रमवारीत 356 व्या क्रमांकावर असलेल्या उदयन माने याने प्रथमच ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला आहे. अर्जेंटिनाच्या एमिलिआनो ग्रीलो याने ऑलिंपिकमधून माघार घेतल्यामुळे माने याला ही संधी मिळाली. माने हा टोकियो ऑलिंपिकसाठी राखीव खेळाडूंच्या यादीत पाहिल्या स्थानी होता. ग्रीलो याने माघार घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय गोल्फ महासंघाच्या संकेतस्थळावर माने हा ऑलिंपिकसाठी पात्र ठरल्याची घोषणा करण्यात आली. ऑलिंपिक मानांकन यादीत अनिर्बन हा 59 व्या  तर माने 60 व्या क्रमांकावर आहे 
पूना क्लब चे अध्यक्ष नितीन देसाई यांनी सांगितले की, जेव्हा आम्हाला हि वस्तुस्थिती ध्यानात आली कि पूना क्लबचे सदस्य इतिहासात प्रथमच ऑलिंपिकमधील वैयक्तिक स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत तेव्हा आम्हाला अत्यानंद झाला. या निमित्ताने ऑलिंपिकच्या नकाशावर वैयक्तिक स्पर्धेत पुणेकर खेळाडूने स्थान मिळविणे म्हणजेच पूना क्लबने  क्रीडा क्षेत्रासाठी केलेले अथक प्रयत्न आणि क्रीडा क्षेत्रासाठी आमची निष्ठा या सगळ्याला आता खऱ्या अर्थाने गोड फळे मिळू लागली आहेत आणि विविध क्रीडा प्रकारात हे प्रयत्न यशस्वी ठरत आहे असे दिसून येते. यामुळे पूना क्लब पुणे आणि  महाराष्ट्र राज्य या सर्वांसाठी हि कामगिरी अभिमानास्पद अशीच आहे.
पूना क्लब आणि सर्व सदस्यांच्या वतीने मी या दोन्ही गोल्फपटूंना तसेच ऑलिंपिकमध्ये सहभागी होणाऱ्या संपूर्ण भारतीय संघाला शुभेच्छा देतो आणि हे सर्वजण पदक जिंकूनच परततील अशी आशा करतो, असा विश्वास ललित चिंचनकर यांनी यावेळी व्यक्त केला. 
चेन्नई येथे जन्मलेला माने हा बेंगळुरू येथे वाढला . मात्र आता तो पुण्यात स्थायिक झाला असून 2015 मध्ये व्यावसायिक खेळाडू बनल्यानंतर पीजीटीआयच्या खेळाडूंमधील सर्वाधिक यशस्वी खेळाडूंपैकी तो एक आहे. तब्बल 6फूट 4 इंच उंचीचा उदयन माने हा पीजीटीआयच्या स्पर्धांमध्ये 11वेळा विजेता ठरला असून सलग तीन स्पर्धा जिंकणारा अशोक कुमारसह केवळ 2दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याने ही कामगिरी डिसेंबर 2019 ते फेब्रुवारी 2020 दरम्यान केली, जेव्हा त्याने टाटा स्टील टूर अजिंक्यपद स्पर्धा 2019, वुटी अँड हल्दी प्रेझेंट्स गोलकोंडा मास्टर 2020(तेलंगणा टुरिझम पुरस्कृत) आणि टाटा स्टील पीजीटीआय प्लेअर चमीपयन्सशिप 2020(ईगलटन पुरस्कृत) या स्पर्धा जिंकल्या आहेत. उदयन माने याने जिंकलेली अखेरची स्पर्धा म्हणजे क्रोमेथस स्कुल पुरस्कृत दिल्ली एनसीआर ओपन ही स्पर्धा होय. पीजीटीआयच्या स्पर्धा मालिकेतील मार्च 2021 मध्ये झालेली झालेली ही अखेरची स्पर्धा होती.
उच्च शिक्षित आणि अत्यंत कुशल खेळाडू असलेल्या उदयन माने याच्या नावावर दोन स्पर्धा जिंकणारा एकमेव युवा भारतीय खेळाडू असल्याचा विक्रम आहे. त्याने 2015 मध्ये ही कामगिरी केली होती.तसेच 2015 मध्ये पदार्पणातच मौसमाखेर पाचवे स्थान पटकावून त्याने त्यावर्षीचा सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू हा किताब पटकावला होता. त्याची सर्वोत्तम कामगिरी 2017 मध्ये पीजीटीआय मानांकन यादी दुसरा क्रमांक अशी आहे. व्यावसायिक खेळाडू बनण्यापूर्वी हौशी गटात उदयनची कामगिरी लक्षवेधी होती. 2014 मध्ये भारतातील अव्वल हौशी खेळाडू असलेल्या उदयन याने इंचॉन आशियाई क्रीडा स्पर्धा आणि आयसेनहॉवर स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. 
याप्रसंगी उदयन माने म्हणाला की, ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्याचा मान मिळाल्याबद्दल मला खरोखरीच आनंद होत आहे.परंतु या वर माझा अजूनही विश्वास बसलेला नाही. पीजीटीआय स्पर्धा मालिकेत 2020, 2021 या मौसमात चांगली कामगिरी केल्यामुळे मी ऑलिम्पिक साठी सहज पात्र ठरेल असे वाटत होते. परंतु भारतातील दुसऱ्या लॉकडाऊन मुळे माझ्या प्रयत्नांवर पाणी पडण्याची शक्यता वाटू लागली. गेल्या काही दिवसात मी केवळ पीजीए टूर आणि युरोपियन टूर या दोनच स्पर्धेत भाग घेतला मात्र या दोन स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केल्यास ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्याचा विश्वास मला होता.
उदयन माने पूढे म्हणाला की, मी आता टोकियो ऑलिंपिकमध्ये अनिर्बनच्या साथीने देशाचे प्रतिनिधित्व करण्यास उत्सुक आहे. तो माझा केवळ चांगला मित्रच नसून एक दर्जेदार गोल्फपटू, एक रोल मॉडेल आणि एक अतिशय चांगला माणूस आहे. तो गोल्फ कोर्सवर आणि बाहेरहिआम्हाला अनेक गोष्टी शिकवत असतो. किंबहुना अनिर्बन आदर्श ठेवावा असाच खेळाडू आहे. मी ऑलिंपिक साठी पात्र ठरल्यामुळे त्यालाही खूप आनंद झाला असून आम्ही टेलिफोनवर अनेकदा एकमेकांशी संवाद साधत असतो.
अनिर्बन लाहेरी सध्या अमेरिकेत असून त्याची ही सलग दुसरी ऑलिंपिक स्पर्धा आहे. त्याने याआधी एसएसपी चौरसिया याच्या साथीने रिओ 2016 ऑलिंपिक मध्ये भाग घेतला होता.
उदयन पुढे म्हणाले की, पूना क्लब गोल्फ कोर्स येथे सराव करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. माझा खेळ व तंदुरुस्ती यात सुधारणा करण्यासाठी क्लबची कार्यकारी समिती आणि सर्व सदस्यांनी मला प्रोत्साहन दिले. येथील सुविधांमुळे मला माझ्या खेळात वेगाने सुधारणा करता आली. 
पूना क्लब गोल्फ कोर्सच्या सर्व सदस्यांना धन्यवाद देऊन उदयन म्हणाला की, पूना क्लब मधील संपूर्ण वातावरण हे खेळाडूंची प्रगती व विकासाला पोषक असेच आहे. उदयोन्मुख व हौशी गोल्फपटूनसह व्यावसायिक खेळाडूंबाबतही गांभीर्याने विचार करण्याची ही मानसिकता आत्मसात केल्याबद्दल पूना क्लबच्या सर्व सदस्यांचे मी अभिनंदन करतो. क्लबच्या समितीने मला अनेक बाबतीत सल्ला देण्याची विंनती केली असून ते माझया सूचना गांभीर्याने घेत असतात. गोल्फकोर्स आणि गोल्फ खेळाडू या दोन्हींची अतिशय काळजी घेत असतात हे निश्चित आहे.
आपले पाहिले प्रशिक्षक विजय दिवेचा आणि सध्याचे प्राधिक्षक लॉरेन्स ब्रदरीज या दोघांनाही धन्यवाद देताना उदयन म्हणाला की, माझ्या कारकिर्दीतील प्रगतीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. मी गेल्या 6 वर्षांपासून व्यवसायिक खेळाडू असून मी 11 स्पर्धा जिंकलो आहव. हौशी खेळाडू म्हणून जिंकलेल्या 6 स्पर्धांपैकी 2 स्पर्धा पूना कक्लब गोल्फ कोर्स येथे झाल्या होत्या. प्रोफेशन गोल्फ टूर ऑफ इंडिया(पीजीटीआय) ही माझी घरचीच स्पर्धा मालिका असून पहिल्या 5 क्रमनाकासाठी ते मानांकन गुण देत असतात. 2019 पासून मिळविलेल्या या गुणांचा मला फायदा झाला आहे. सलग 3 स्पर्धा जिंकल्यावर चौथी स्पर्धा थोडक्यात हरल्यानंतरही माझे जागतिक मानांकन भारतात सर्वोत्तम होते आणि मी विश्वक्रमवरीतील सर्वोच्च मानांकित भारतीय खेळाडू होतो. त्यामुलेच मी ऑलिंपिकसाठी पात्र ठरू शकलो.
माने पुढे म्हणाला की, 2014 आशियाई स्पर्धांप्रमाणे मोठ्या क्रीडा स्पर्धांमध्ये खेळण्याचा अनुभव ऑलिंपिक साठी मला उपयोगी बठरेल अर्थात ऑलिंपिक ही फारच वेगळ्या दर्जाची स्पर्धा आहे. त्यामुळे माझा हा पहिलाच अनुभव कल्पनेच्या पलिकडचा असणार आहे. 
टोकियो ऑलिंपिक मधील पुरुषांची गोल्फ स्पर्धा कासुमीगासेकी कंट्री क्लब येथे 29 जुलै ते 1 ऑगस्ट 2021 दरम्यान होणार असून यामध्ये एकूण 60 खेळाडू सहभागी होणार आहे.