महाविद्यालयांचा पसंतीक्रम देण्याची सुविधा आजपासून खुली, ११वी प्रवेशासाठी दोन लाख जणांची नोंदणी

पुणे, १७/०८/२०२१: अकरावी प्रवेशाच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतंर्गत तब्बल दोन लाख १० हजार ६५३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पुण्यातील ४२ हजार ४६६ विद्यार्थ्यांनी नोंदणी झाली आहे. विद्यार्थ्यांना २२ ऑगस्टपर्यंत नोंदणी, अर्जाचा भाग एक भरणे, तसेच अर्ज पूर्ण करता येणार आहेत. तर प्रवेशाच्या पहिल्या नियमित फेरीसाठी महाविद्यालयांचा पसंतीक्रम निवडण्याची सुविधा आजपासून (मंगळवार) उपलब्ध होणार असून विद्यार्थ्यांना २२ ऑगस्टपर्यंत पसंतीक्रम देता येणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर या महापालिका क्षेत्रात अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यंदा या प्रवेश प्रक्रियेतंर्गत चार नियमित प्रवेश फेऱ्या होणार असून त्याचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर केले आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुल्क भरण्यासाठी डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या प्रक्रियेदरम्यान एकूण सुमारे ९६ हजार ९२९ विद्यार्थ्यांनी, तर पुण्यातील २० हजार ४२० विद्यार्थ्यांनी कागदपत्र अपलोड केले आहेत.

विद्यार्थ्यांचे ऑनलाइन नोंदणी, अर्जाचा भाग एक भरून सबमिट करणे, संबंधित शाळा किंवा मार्गदर्शन केंद्रामार्फत अर्ज पडताळणी करणे, अर्ज भरणे, त्यात दुरुस्ती करणे आणि अर्ज पडताळून घेणे, यासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. तसेच कनिष्ठ महाविद्यालयांतील उपलब्ध जागांची माहिती दर्शविणे, पहिल्या फेरीसाठी महाविद्यालयांचा पसंतीक्रम निवडणे, यासाठी १७ ते २२ ऑगस्ट दरम्यान मुदत दिली आहे.
……
इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी संकेतस्थळ : https://11thadmission.org.in