मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्परता दाखवावी – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

पुणे, 5 मे 2021: मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्याला नसून तो केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनाच असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्परता दाखवावी, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी व लढवय्या समाजासाठी दुर्देवी आहे.

महाराष्ट्राने मराठा समाजाचा स्वाभिमान जपण्यासाठीच आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. राज्याच्या विधी मंडळात सर्वच राजकीय पक्षांनी एकमुखाने घेतलेल्या या निर्णयावर आता सर्वोच्च न्यायालयाने वरवंटा फिरवला.

महाराष्ट्राची विधानसभा सार्वभौम आहे व सरकार हे लोकांचा आवाज आहे. मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील मोठ्या पिडीत वर्गाचा आक्रोश असल्यामुळेच सरकारने निर्णय घेतला. आता मराठा आरक्षणाबाबतचा तातडीचा निर्णय पंतप्रधान व राष्ट्रपतींनीच घ्यावा ही आमची त्यांना हात जोडून विनंती आहे. त्याआाधी शहाबानो प्रकरण, ॲट्रोसिटी कायद्यासंदर्भात तसेच 370 कलम काढण्यासंदर्भात, केंद्राने तत्पर निर्णय घेवून न्यायप्रियता दाखवली आहेच. यासाठी घटनेतही बदल केले आहेत. आता तीच गती मराठा आरक्षणाबाबत दाखवावी,असेही त्यांनी सांगितले. खासदार छत्रपती संभाजीराजे हे गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधानांची वेळ मागत आहेत, त्यांना पंतप्रधानांनी का वेळ दिली नाही ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठी कायदेशीर लढाई चालूच राहील,असे आश्वासन देत, न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्राचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करु नयेत. जनतेने उगाच डोकी भडकवून घेवू नये,असे आवाहनही त्यांनी केले