पुणे: येरवडा कारागृहात कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे, ०८/०७/२०२२: येरवडा कारागृहात एका कैद्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

सचिन मधुकर नरवाडे (वय ३१, रा. तांबे बिल्डींग, बजरंगवाडी, शिक्रापूर, मूळ रा. सावंगी, ता. भोकरदन, जि. जालना) असे आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे. २ जून रोजी शिक्रापूर परिसरातील बजरंगवाडीत सचिनने चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा गळा दाबून खून केला होता. या प्रकरणात शिक्रापूर पोलिसांनी सचिनला अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालायाच्या आदेशाने सचिनची येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते.

गुरुवारी (७ जुलै) दुपारी तीनच्या सुमारास न्यायालयीन बंद्यांना मोकळे सोडण्यात आले होते. अर्ध्या तासानंतर कैद्यांची मोजणी करण्यात आली. त्या वेळी सचिन नसल्याचे आढळून आले नाही. सचिनने बराक क्रमांक दोनच्या परिसरातील वडाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. सचिने चादर झाडाला बांधून आत्महत्या केल्याचे आढळून आले, असे येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे यांनी सांगितले.