October 24, 2025

आंदोलनकर्त्यांनो शो बाजी बंद करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला

पुणे, ५ एप्रिल २०२५: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून विविध स्तरावर याचा निषेध केला जात आहे. दरम्यान विविध संघटना व राजकीय राजकीय पक्षांकडून या रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले जात आहेत. मात्र आता आंदोलनकर्त्यांनी शो बाजी बंद करावी, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांवी व्यक्त केले आहे.

हे प्रकरण समोर आल्यानंतर शुक्रवारी तब्बल 15 पक्ष आणि संघटनांनी रुग्णालयासमोर येत प्रशासनाचा निषेध नोंदवला. भाजप महिला आघाडीच्या नेत्यांनी आक्रमक होत एक हॉस्पिटलमध्ये तोडफोड देखील केली आहे. त्यानंतर आज देखील रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात आंदोलन सुरूच आहेत. दरम्यान काही आंदोलकांनी रुग्णालयाच्या इमारतीवर चढून आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिल्या असून आज आंदोलन करणाऱ्या संघटनांना त्यांनी चांगलंच ठणकावला आहे.

पुण्यामध्ये एका कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटना अतिशय दुर्दैवी आहे. त्यामुळे या प्रकरणातील दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी काही एसओपी निर्माण झाल्या पाहिजे. यासाठी आमचा प्रयत्न आहे.दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे मंगेशकर कुटुंबानी मोठ्या मेहनतीतून उभारला आहे. या रुग्णालयात अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि उपचार केले जातात. त्यामुळे येथे सर्व प्रकार चुकिचेच होतात असे देखील म्हणता येत नाही. परंतु नुकतीच झालेली घटना ही असंवेदनशीलच होती. मात्र रुग्णालय प्रशासन जर ही चूक सुधारत असेल तर त्याचा मला आनंद आहे.

नुकत्याच झालेल्या अधिवेशनात कायद्यामध्ये बदल करून धर्मादाय आयुक्तांना काही अधिकार देण्यात आले असून सर्व धर्मदाय व्यवस्था ही ऑनलाइनच्या माध्यमातून एका प्लॅटफॉर्मवर यावी असा प्रयत्न आहे. ज्याद्वारे रुग्णालयातील उपलब्ध बेड आदींवर लक्ष ठेवणे सोपे होईल. त्याचबरोबर मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता कक्ष या यंत्रनेशी जोडण्याचा आमचा मानस आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले.

दीनानाथ रुग्णालय प्रकरणाची सरकारने दखल घेतली असून त्याची योग्य कारवाई करण्यात येईल. मात्र सध्या दीनानाथ रुग्णालयाच्या परिसरात आंदोलने होत आहेत. त्यात काही लोक रुग्णालयाच्या ईमारतीवर चढून आंदोलन करत असल्याचे प्रकार घडत आहेत. अशी शो बाजी करणे बंद झाले पाहिजे. तर भाजप महिला आघाडीकडून करण्यात आलेली रुग्णालयाची तोडफोड ही चुकीचीच आहे. ती महिला आघाडी भाजपची असो वा इतर कोणत्याही पक्षाची अशा प्रकारे तोडफोड करणे अत्यंत चुकीचे आहे.

सध्या रुग्णालय प्रशासनावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. परंतु जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत कोणत्या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करता येईल याची स्पष्टता नाही. त्यामुळे अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.