सन 2022 चा जनसेवा पुरस्कार पूर्णम इको व्हिजन फाऊंडेशन आणि वनप्रस्थ फाऊंडेशन संस्थांना जाहीर

पुणे, 22 नोव्हेंबर 2022 : जनसेवा सहकारी बँक लि.च्या 50 व्या वर्धापन दिन समारंभानिमित्ताने जनसेवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. हा पुरस्कार सोहळा गुरूवार, दि.24 नोव्हेंबर 2022 रोजी महात्मा ज्योतीराव फुले सांस्कृतिक भवन,वानवडी येथे सायंकाळी 5:00 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण,वस्त्रोद्योग,संसदीय कार्य मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. याबरोबरच कार्यक्रमाचे अध्यक्ष संघचालक,रा.स्व.संघ,प.महाराष्ट्र प्रांत नानासाहेब जाधव आणि प्रमुख वक्ते अखिल भारतीय प्रचार प्रमुख,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुनिलजी आंबेकर उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर या कार्यक्रमास शहरातील लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांची उपस्थिती असणार आहे,अशी माहिती जनसेवा सहकारी बँक लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम नाईक,अध्यक्ष डॉ.राजेंद्र हिरेमठ,उपाध्यक्ष रवि तुपे, संचालक राजेंद्र वालेकर, संचालक राजन वडके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावर्षी जनसेवा बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त जनसेवा पुरस्कार 2022 – पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्‍या पूर्णम इको व्हिजन फाऊंडेशन , पुणे आणि वनप्रस्थ फाऊंडेशन, सिन्नर यांना प्रदान केला जाणार आहे. तसेच जनसेवा बँकेचे सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या औचित्याने बँकेचे संस्थापक सदस्य मा.श्री.वसंतराव देवधर यांना जनसेवा जीवनगौरव पुरस्कार तसेच बँकेचे संस्थापक संचालक सदस्य मा. श्री. रघुनाथ तथा नाना कचरे आणि मा. श्री. मधुकर तथा अण्णा टेमगिरे यांना जनसेवा कृतज्ञता सन्मान हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. बँकेच्या 50 वर्षांच्या ऐतिहासिक वाटचालीचा आढावा घेणारे जनसामान्यांची असामान्य बँक हे पुस्तक प्रकाशित केले जाणार आहे. रुपये 1 लाख 1 हजार आणि सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.

बँक स्थापनेची पार्श्वभूमी

हडपसरसारख्या तत्कालीन ग्रामीण भागातील समविचारी कार्यकर्त्यांनी ( कै. मामासाहेब हजारे, कै. आबनावे गुरुजी, श्री. रघुनाथ कचरे, श्री. मधुकरराव टेमगिरे, कै. रामचंद्र मारुती रासकर ) यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन सुरवातीस भिशी मंडळ स्थापन केले. त्याचा व्यवहार वाढत चालल्याचे लक्षात आल्यानंतर आपली स्वतंत्र बँक असावी असा विचार पुढे आला आणि त्यातूनच 1972 साली जनसेवा सहकारी बँक,हडपसर,पुणे ची स्थापना करण्यात आली. बँकेच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ता उभा करणे, ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक सहाय्य असा प्रमुख हेतू होता. बँकेच्या माध्यमातून सेवाभावी वृत्तीच्या संचालकांनी समाजातील सर्व घटकांना आर्थिक सहाय्य करून चांगला फायदा मिळवून दिल्यामुळे बँक अल्पावधीतच लोकप्रिय झाली आणि बहुत जनांसी आधारू अशी बँकेची प्रतिमा तयार झाली.

50 वर्षाच्या प्रगतीचा आलेख

बँकेच्या सर्व सभासद, ग्राहक, हितचिंतक यांनी बँकेच्या स्थापनेपासून दाखविलेल्या विश्वासामुळे आणि पाठिंब्यामुळे बँक सुवर्ण महोत्सवी वर्षापर्यंत प्रगती करू शकलेली आहे.कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेला 50 वर्ष पूर्ण होणे म्हणजे स्थिरता, सक्षमता, परिपक्वता व व्यापक दृष्टीकोन यादृष्टीने पहिले जाते. यापुढेही असाच विश्वास आणि पाठींबा हा बँकेस प्राप्त होईल अशी खात्री आहे.

जनसेवा सहकारी बँक लि हडपसर पुणे हि बँक एक अग्रगण्य सहकारी बँक असुन गेली अनेक वर्षे पुणे जिल्ह्यात नॉन शेडूयल बँकांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. दि.31.03.2022 अखेर रु. 2046.64 कोटी ठेवी आणि रु. 1037.40 कोटींची कर्जे असुन बँकेचा एकूण व्यवसाय रु. 3084.04 कोटींचा आहे. सध्या बँकेच्या एकूण 30 शाखा असुन त्यापैकी पुणे व पिंपरी चिंचवड शहर येथे 21, पुणे जिल्ह्यात 03, सातारा जिल्ह्यात 03, नवी मुंबईमध्ये ठाणे व वाशी मिळून 2, आणि नाशिक येथे 1 असा शाखाविस्तार आहे. बँकेची स्वतःची 26 एटीएम असून रूपे कार्ड द्वारे बँकेच्या ग्राहकांना अन्य बँकांच्या जवळपास 125000 पेक्षा अधिक एटीएम द्वारे व्यवहार करता येतात. बँकेने स्वतःचा पॅरा बँकिंग विभाग सुरु केलेला असुन त्यामार्फत विमा व्यवसाय, म्युच्युअल फंड आदि सेवा ग्राहकांना पुरविल्या जातात. सध्याचे युग हे डिजिटल युग असल्यामुळे बँकिंग सेवेमध्ये त्याचे अनन्यसाधारण महत्व लक्षात घेऊन बँक डिजिटल पद्धतीने अद्ययावत व अधिक सुरक्षित व्यवहाराची सुविधा बँक आपल्या ग्राहकांना देत आहे. जनसेवा बँक ग्राहकांना आर्थिक सेवा चांगल्याप्रकारे देत असून, त्याचबरोबर शैक्षणिक, सामाजिक, आरोग्यविषयक क्षेत्रामध्ये योगदान देत असते.

एकूणच बँकेच्या दृष्टीने गौरवाची बाब म्हणजे बँकेने मुख्य कार्यालयासाठी नूतन सात मजली इमारत बांधलेली असून त्याचा भव्य उद्घाटन सोहळा दि.10.02.2019 रोजी केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी यांच्या शुभहस्ते पार पडला.हि नूतन वास्तू पूर्णतः ग्रीन बिल्डींग या संकल्पनेतून बांधण्यात आलेली आहे. बँकेचे विविध ठिकाणी असलेले विभाग एकाच वास्तूमध्ये स्थलांतरीत झालेले आहेत.

बँकेचे सामाजिक दायित्व व समाज कल्याण कार्य

जनसेवा बँक सामाजिक उत्तरदायित्व मोठ्या कर्तव्य भावनेने तसेच कोणताही गाजावाजा न करता पार पाडीत आहे. वडगाव मावळ येथील गोपाल नवजीवन केंद्र’’ (वनवासी विद्यार्थी वसतिगृह). स्व. तात्या बापट स्मृती समिती (पूर्वांचलमधील विद्यार्थी व विद्यार्थीनींचे वसतिगृह ) व जनकल्याण समिती रा. स्व. संघ. महाराष्ट्र प्रांत ( महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यातील 734 गावात प्राथमिक वैद्यकीय सेवा देण्याचे काम व आपत्ती विमोचानाचे काम), प्रकाश ज्योत विद्यालय (2 विशेष विद्यार्थी दत्तक), सुहृद मंडळ हडपसर कर्णबधीर विद्यालय ( 2 कर्णबधीर विद्यार्थी दत्तक) इ. संजीवनी प्रतिष्ठान (मतिमंद मुलामुलींसाठी शैक्षणिक खर्च) धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान संचालित अनाथालय (अनाथ मुले मुलींचा मोफत सांभाळ व शिक्षण) इ संस्थाना बँक आर्थिक मदत करीत असते. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेली आळंदी ते पंढरपूर या वारीमधील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत बँकेच्या वतीने गेली अनेक वर्षे करण्यात येत आहेत. मागील वर्षापासून बँकेने लोकमंगल सेवा प्रतिष्ठान व स्व. तात्या बापट स्मृती समिती यांना पुणे पंढरपूर या प्रवासात रुग्णवाहिकेसाठी व सेवा सहयोग फाउंडेशन च्या निर्मलवारीसाठी आर्थिक सहकार्य करण्यात आले.

1. एखतपूर गावाचा विकास – जनसेवा सहकारी बँकेने सासवडजवळील एखतपूर हे गाव सर्वांगीण विकासासाठी दत्तक घेतलेले आहे. एखतपूर गावात पाण्याची मुख्य समस्या होती. मार्च 2013 पासून पावसाळ्यापर्यंत बँकेच्यावतीने रोज टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर व्हावी यासाठी जुन 2013 पर्यंत गावातील कर्‍हा नदीकाठी विहीर पुनर्भरणाचे काम करण्यात आले व त्यानंतर झालेल्या पहिल्याच पावसात विहीर पाण्याने काठोकाठ भरली. याचा परिणाम म्हणून 2014 पर्यंत विहिरीमधील पाणी पुरले. कर्‍हा नदीकाठी असलेला बंधारा दुरूस्तीसाठी बँकेने आर्थिक मदत केली. त्यामुळे गावाचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला आहे.सर्वांगीण विकासाचा एक महत्वाचा टप्पा म्हणून बँकेचे सर्व संचालक व सेवकांचे वतीने गावात 500 ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. तसेच गावातील पुरुष, महिला व लहान मुले यांची आरोग्यातपासणी करण्यात आली.

2. पुरंदर तालुक्यातील खळद या गावाच्या पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनसाठी बँकेने भरघोस आर्थिक सहाय्य केले आहे. यामुळे आज गावाचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटलेला आहे.

3. जनसेवा सहकारी बँकेच्या वतीने इयत्ता 10 व 12 वी परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या सभासद, ग्राहक व सेवकांच्या पाल्यांचा दरवर्षी सत्कार समारंभ आयोजित केला जातो.

4. दि. 14 एप्रिल रोजी दरवर्षी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम साजरा केला जातो. त्याठिकाणी येणार्‍या बंधू भगिनींसाठी पेयपानाची व्यवस्था केली जाते.

5. पालखी सोहळा शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या आळंदी ते पंढरपूर तसेच देहु ते पंढरपूर या पायीवारीतील पालखींचे स्वागत बँकेतर्फे केले जाते. त्यावेळी वारीतील भाविक व वारकरी यांना पेयपान व खाद्यपदार्थांचे वाटप केले जाते.तसेच पालखी सोबत असलेल्या रुग्णवाहिकेसाठी देखील मदत केली जाते.

6. हळद-कुंकू मकरसंक्रांति निमित्त दरवर्षी सभासद, ग्राहक व सेवकांच्या महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ हडपसर परिसरात आयोजित करण्यात येतो.

जनसेवा पुरस्कार

बँकेच्या वर्धापनदिन समारंभाच्या निमित्ताने प्रदान करण्यात येणारा ‘ जनसेवा पुरस्कार ’ प्रदान करण्यास बँकेने दि.24 ऑक्टोबर 1998 पासून सुरुवात केली आहे.

सन 2019 चा जनसेवा पुरस्कार ’’ गरजू आर्थिक, दुर्बल रुग्णांना अत्यल्प दरात उच्चतम वैद्यकीय मदत करणार्‍या नाना पालकर स्मृती समिती या संस्थेस देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम रु. 1,01,000/- सन्मान चिन्ह, मानपत्र, श्रीफळ, शाल अशा प्रकारचे होते .

सन 2020 चा जनसेवा पुरस्कार ’’ अस्तित्व प्रतिष्ठान , वीर, ता. पुरंदर या संस्थेस देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम रु. 1,01,000/- सन्मान चिन्ह, मानपत्र, श्रीफळ, शाल अशा प्रकारचे होते.

सन 2021 चा जनसेवा पुरस्कार ’’ तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यास, वेल्हे या संस्थेस देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम रु. 1,01,000/- सन्मान चिन्ह, मानपत्र, श्रीफळ, शाल अशा प्रकारचे होते.