September 24, 2025

मधुमेह मुक्तीच्या कथा सांगणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन

पुणे, दि. ५ फेब्रुवारी, २०२४ : मधुमेह हा जीवनशैलीशी संबंधित आजार असल्याने जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणत मधुमेहापासून मुक्तीच्या कथा सांगणाऱ्या ‘डॉ. दीक्षित जीवनशैली: मधुमेह मुक्तीची गुरुकिल्ली’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच संपन्न झाले.

असोसिएशन फोर डायबेटीज अँड ओबेसिटी रिव्हर्सल (अडोर) आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या डायबेटीज केअर उपक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने टिळक रस्त्यावरील आयएमए हाऊसच्या के.एच.संचेती सभागृहात सदर कार्यक्रम संपन्न झाला.

ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ सुरेश शिंदे, ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ जयंत नवरंगे, असोसिएशन फोर डायबेटीज अँड ओबेसिटी रिव्हर्सल अर्थात अडोरचे अध्यक्ष, ज्येष्ठ मधुमेह उपचार तज्ज्ञ व दीक्षित आहारपद्धतीचे प्रणेते डॉ. जगन्नाथ दीक्षित, इन्फोसिस, पुणेचे उपाध्यक्ष प्रवीण कुलकर्णी, अडोरचे विश्वस्त आणि सभासद आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी डायबिटीज रिव्हर्सल काउंसिलिंग सेंटर, पुणेच्या सदस्यांसह भारतभरातील ज्या रुग्णांनी मधुमेह मुक्तीच्या दिशेने यशस्वीपणे वाटचाल केली आहे, अशांचा स्मृतिचिन्ह देऊन कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी यातील प्रतिनिधींनी आपला मधुमेह मुक्तीचा प्रवास उपस्थितांसमोर उलगडून दाखविला. यामध्ये कराड येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुहास देशपांडे, कल्याण येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. सुहास चौधरी आणि निवृत्त लष्करी अधिकारी विठ्ठल थोरात यांचा समावेश होता.

आज दीक्षित जीवनशैलीचा अंगीकार करून मधुमेहापासून मुक्ती मिळविलेले नागरिक हे समाजासाठी आदर्श आहेत. या सर्वांनी आहाराचे काटेकोरपणे पालन केलेच शिवाय आपल्या जीवनशैलीमध्ये, सकारात्मक बदल केले आहेत. आज अनेकांना आपल्याला मधुमेह झाला आहे याचीही कल्पना नसते. यामुळेच ‘मधुमेह आणि लठ्ठपणापासून मुक्त जग’ ही आम्ही सुरु केलेली मोहीम प्रत्येक भारतीयासाठी महत्त्वाची आहे. देशाचा एक जबाबदार नागरिक या नात्याने आपण सर्वांनी किमान ही जीवनशैली आपल्या चांगल्यासाठी आजमावून पाहिली पाहिजे. याचे सकारात्मक परिणाम दिसून आले तर ते यशच आहे, असे मत यावेळी डॉ दीक्षित यांनी व्यक्त केले. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील डायबेटिज रिव्हर्सल काउंसिलिंग सेंटरला भेट देऊन नागरीकांनी यासंबंधित मोफत मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

डॉ. सुरेश शिंदे यांनी लठ्ठपणा आणि मधुमेहाचा आपल्या समाजावर कसा परिणाम होत आहे यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, “आज आपण गरजेपेक्षा जास्त आणि दिवसातून अनेक वेळा खातो. यावर आपले नियंत्रण असेल, तरच अशा मधुमेहासारख्या आजारांना आळा घालण्या संदर्भातील मार्ग निघू शकेल. डॉ दीक्षित यांनी सुरू केलेली ‘स्थुलत्व आणि मधुमेह मुक्त विश्व’ ही मोहीम पुढे नेणे आणि त्याचा जास्तीत जास्त प्रसार करणे ही एक समाज म्हणून आपली जबाबदारी आहे.”

यावेळी बोलताना प्रवीण कुलकर्णी म्हणाले, “एका अहवालाप्रमाणे आज ११- १२ कोटी भारतीय हे मधुमेहाने ग्रस्त आहेत त्यापैकी १६ कोटी नागरिक हे प्री-डायबेटिक आहेत आणि १० पैकी ४ लोकांना लठ्ठपणा, रक्तदाब इत्यादींशी संबंधित इतर काही समस्या आहेत. दिवसेंदिवस, अगदी किशोरवयीन मुले आणि शाळेत जाणारे विद्यार्थी देखील प्री-डायबेटिक किंवा डायबेटिक होण्याचे प्रमाण वाढत आहे म्हणूनच एवढे मोठे आव्हान रोखण्यासाठी तात्काळ आणि आवश्यक ती सर्व पाऊले उचलली पाहिजेत.” जीवनशैलीशी संबंधित आजारांवर मात करण्यासाठी जीवनशैलीमधील बदल हा उपचारांचा एक भाग असायला हवा, यावर इन्फोसिस फाऊंडेशनचा विश्वास आहे आणि म्हणूनच आम्ही अडोर ट्रस्ट सोबत कार्यरत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

डॉ जयंत नवरंगे यांनी उत्तम जीवनशैलीसाठी डॉ दीक्षित यांनी सांगितलेल्या सोप्या नियमांचे पालन करण्यावर भर द्यावा असे सुचविले. त्यांनी डॉ. दीक्षित यांनी आयोजित केलेल्या ’९० दिवसात वजन कमी करण्याच्या चॅलेंज’ मधील स्वत:च्या सहभागावर प्रकाश टाकला आणि त्याचवेळी इतरांनी देखील त्यात सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले.

वास्तुविशारद शताक्षी दस्तुरे यांनी ‘डॉ. दिक्षित लाइफस्टाईल: मास्टर की फॉर डायबेटिज रेमिशन’ या इंग्रजी पुस्तकाचे लेखन केले आहे, तर डॉ रत्नाकर गोरे आणि डॉ सुहासिनी भालेराव यांनी मराठी आवृत्तीसाठी योगदान दिले आहे. पुस्तकात एकूण ९१ अनुकरणीय यशोगाथांचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मोरे यांनी केले तर विश्वास जोशी यांनी आभार मानले.