December 23, 2025

Pune: रिपाईला पुण्यात हव्यात पंधरा जागा, भाजपसोबत पहिली बैठक संपन्न

पुणे, २३ डिसेंबर २०२५: महापालिका निवडणूकीसाठी महायुतीतील घटक असलेल्या भाजप आणि रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडीया या दोन्ही पक्षांच्या शहराध्यक्षांची प्राथमिक बैठक मंगळवारी भाजप कार्यालयात पार पडली. या बैठकीत रिपाई कडून २०१७ मधील पाच जागांसह आणखी दहा जागांची मागणी करण्यात आली आहे. त्यानंतर भाजपकडून याबाबतचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना रिपाईच्या शहर पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पुणे शहर प्रभारी शैलेंद्र चव्हाण, शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, संघटन सचिव परशुराम वाडेकर, महाराष्ट्र प्रदेश सदस्य अशोक कांबळे, भाजप धीरज घाटे, निवडणूक प्रभारी गणेश बिडकर या बैठकीस उपस्थित होते. २०१७ मध्ये झालेल्या निवडणूकीत रिपाईचे सात उमेदवार भाजपच्या चिन्हावर निवडणूकांना सामोरे गेले होते. त्यात पाच जागा पक्षाने जिंकल्या होत्या, त्या जागा कायम ठेवण्यासह आणखी दहा जागांच्या ठिकाणी पक्षाला अनुकूल स्थिती असून त्याचा सकारात्मक विचार भाजपने करावा अशी मागणी यावेळी रिपाईच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आल्याची सांगण्यात आले. तसेच पुढील काही दिवसात अंतीम बैठक घेवून हा जागा वाटपाचा निर्णय अंतीम केला जाणार असल्याचे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले.