यशवंत घरकुल व दिव्यांग घरकुल लाभार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन, १ हजार लाभार्थ्यांना घरकुले मंजूर

पुणे, दि . 8/7/2022: जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या यशवंत घरकुल योजना आणि दिव्यांग घरकुल योजनेंतर्गत घरकूल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

यावेळी श्री. प्रसाद म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) योजनेच्या धर्तीवर जिल्हा परिषदेमार्फत नव्याने ही योजना राबविण्यात येणार आहे. यशवंत घरकुल योजना आणि दिव्यांग घरकुल योजनेंअंतर्गत मंजूर १ हजार १६ लाभार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या फंडातून निधी उपलब्ध करण्यात येणार असून डिसेंबर २०२२ पर्यंत या सर्व घरकुलांचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी ग्रामीण गृह निर्माण राज्य व्यवस्थापक कक्षाचे वास्तुविशारद परमेश्वर शेलार यांनी घरकुल बांधणी विषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, सहायक प्रकल्प अधिकारी प्रताप पाटील, विस्तार अधिकारी मानसी देशपांडे, नितिन पतंगे, तालुक्यांचे गट विकास अधिकारी, संबंधित विभागाचे क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी, लाभार्थी उपस्थित होते.