पुणे: बंदी असतानाही बैलगाडा शर्यत लावल्याप्रकरणी पोलिसांनी केले १२ जणांना अटक

पुणे, १८ जुलै २०२१: – उच्च न्यायालय आणि राज्य सरकारने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातलेली असतानाही शहरातील गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी १२ जणांना अटक केली असून दोघे फरार आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये बैलगाडा शर्यतीसाठी राज्यात प्रसिध्द असणाऱ्या पंढरीनाथ फडके यांचाही समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू असतानाही शनिवारी (दि.१७) बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


संतोष अशोक ननवरे (रा.कोंढवा), योगेश बाळासाहेब रेणुसे, मयूर दिलीप शेवाळे, पंढरीनाथ जगन फडके, हरिश्चंद्र भागा फडके, पद्माकर रामदास फडके, ऋषीकेश सूर्यकांत कांचन, संकेत शशिकांत चोरगे, यश राजू भिलारे, संतोष शिवराम कुडले, राहूल प्रकाश चौधरी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार रविंद्र चिप्पा यांनी फिर्याद दिली आहे.


राज्यात बैलांची शर्यत आयोजनावर बंदी आहे. असे असतानाही शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास आरोपींनी शासकीय आदेशाचा भंग करुन गुजरवाडीत गर्दी जमवली होती. बेकायदेशीरपणे बैलांची शर्यत आयोजित करुन बैलांना गाडयांना जोडुन त्यांना मारहाण केली. त्यांच्या शेपटया पिरगाळुन जबरदस्तीने आरडा ओरडा करत पळवुन निदर्यतेने वागणूक दिली. त्याशिवाय पोलीस हवालदार रवींद्र चिप्पा यांना आरोपींनी वाद-विवाद करुन धक्का बुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणत शर्यतीमधील एक बैल व एक छकडा पळवून लावले. या सर्व प्रकारासाठी आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.