पुणे: सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीला १२५ दुचाकींची रॅली, सहकारनगर पोलिस ठाण्यात २०० जणांविरूद्ध गुन्हा दाखल

पुणे, दि. 16 मे 2021: करोना नियमावलीचे उल्लंघन करीत सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीला तब्बल १०० ते १२५ दुचाकींची रॅली काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार धनकवडी ते कात्रज स्मशानभुमी परिसरात घडला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात १५० ते २०० जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका टोळक्याने शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास सराईत गुन्हेगार माधव वाघाटे याचा खून केला होता. त्यानंतर शनिवारी (दि.15) दुपारी साडेबाराच्या सुमारास त्याच्यावर कात्रज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. त्यामुळे १०० ते १२५ जणांनी दुचाकीवरून रॅली काढली. टोळक्याने बालाजीनगर ते धनकवडी आणि कात्रज स्मशानभूमीपर्यंत विना परवानगी रॅली काढून शांततेचा भंग केला. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर मिरवणूक आणि रॅली काढण्यास बंदी असतानाही, टोळक्याने रॅली काढल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र वेंजळे यांनी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी सिद्धार्थ पलंगे, कुणाल चव्हाण, सुनील खाटपे, अमित खाटपे, सौरभ भगत, राजकुमार परदेशी, ऋषीकेश भगत, गणेश फाळके याच्यासह साथीदारांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कोट- ” कोरोना नियमावलीचे आदेश झुगारून अंत्यविधीला १०० ते १२५ जणांनी दुचाकी रॅली काढल्याचे दिसून आले आहे. सीसीटीव्ही फुटेजमधील दुचाकींचे क्रमांक शोधून आरोपींचा शोध घेतला जात आहे.” – बी. एस. खेंगरे, पोलीस उपनिरीक्षक, सहकानगर पोलीस ठाणे