पुणे, ३ सप्टेंबर २०२५: पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीच्या प्रारूप प्रभागरचनेत सीमोल्लंघनाने अक्षरश: उलथापालथ झाली आहे. त्यामुळे माजी नगरसेवकासह इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत. भाजप, शिवसेना शिंदे गटाला प्रभाग रचना अनुकूल झाल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रारूप प्रभाग रचनेवर आतापर्यंत १हजार ३८२ हरकती आणि सूचना नोंदविण्यात आल्या आहेत. एका दिवसात ७८५ हरकती दाखल झाल्या आहेत. प्रत्यक्षात ४१ प्रभागांमधील ८ प्रभागांमध्ये एकही हरकत दाखल झालेली नाही या हरकती आणि सूचना नाेंदविण्यासाठी अवघ्या दोन दिवसाची मुदत राहिली आहे.
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नगरसेवकांची संख्या १६५ असून ४१ प्रभाग आहेत. त्यापैकी ४० प्रभाग चार सदस्यीय, तर ३८ क्रमांकाचा आंबेगाव-कात्रज प्रभाग पाच सदस्यीय आहे. पालिकेमध्ये ३४ गावांचा समावेश करण्यात आला होता; पण उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गावे वगळली आहेत. त्यामुळे पालिकेचे क्षेत्रफळ कमी झाले आहे. त्यामुळे नव्याने प्रभागरचना करण्यात आली आहेत.
प्रभाग रचनेमुळे अनेक माजी नगरसेवक हरकती सूचना नोंदविण्यासाठी सरसावले आहेत. त्यात अनुकूल असलेला भाग जोडावा, प्रतिकूल असलेला भाग काढून टाकावा, गल्ल्यांऐवजी मुख्य रस्त्यांवरून प्रभागाची सीमा निश्चित करावी, यासह इतर हरकती घेतल्या जात आहेत.पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी २२ ऑगस्ट रोजी महापालिकेच्या प्रभागांची प्रारूप रचना जाहीर केली. त्या दिवसापासून हरकती आणि सूचना नोंदविण्यास सुरुवात झाली आहे. प्रभाग रचनेवर हरकती व सूचना करण्याची मुदत ४ सप्टेंबरपर्यंत आहे.
…………………………………..
एकही हरकत नसलेले प्रभाग पुढील प्रमाणे – प्रभाग ५ कल्याणी नगर – वडगावशेरी, प्रभाग १० बावधन – भुसारी काॅलनी,प्रभाग १२ छत्रपती शिवाजीनगर – माॅडेल काॅलनी, प्रभाग २५ शनिवारपेठ– महात्मा फुले मंडई, प्रभाग २९ डेक्कन जिमखाना – हॅपी काॅलनी, प्रभाग ३० कर्वेनगर – हिंगणे होम काॅलनी,प्रभाग ३१ मयूर काॅलनी – कोथरूड,प्रभाग ४० कोंढवा बुद्रुक – येवलेवाडी याचा समावेश आहे.
……………………….
सर्वाधिक हरकती विमानगर लोहगाव प्रभागात
पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेत प्रभाग क्रमांक ३ विमाननगर लोहगाव मध्ये ३८१ हरकती आणि सुचना आल्या आहेत. त्या खालोखाल प्रभाग ३४ न०हे – वडगाव बुद्रुक मध्ये २७८ आणि प्रभाग १५ मांजरी बुद्रुक – साडेसतरा नळी मध्ये २२४ हरकती सुचना आल्या आहेत.
More Stories
समाविष्ट १६ गावांसाठी ड्रेनेज प्रकल्पाला ३२३ कोटींचा अमृत निधी
पुणेकरांनी गणेशोत्सवात जपले पर्यावरण, साडेसहा लाख गणेशमूर्तीचे विसर्जन
Pune: सायकल स्पर्धेसाठी पुण्यातील रस्त्यांचा मेकओव्हर – १४५ कोटींची तरतूद मंजूर