पुणे : दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेत, वेल्हे तालुक्यातील कर्नवडी गावातील 37 कुटुंबांचे प्रशासनाकडून स्थलांतर

पुणे, २७ जुलै २०२१: महाड येथील तळई गावात दरड कोसळल्याने घडलेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वेल्हे- महाड तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या कर्नवडी गावातील 37 कुटुंबांचे प्रशासनाकडून स्थलांतर करण्यात आले आहे. वेल्हे पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी याबाबत माहिती दिली.


सहायक पोलीस निरीक्षक पवार म्हणाले,” वेल्हे तालुक्याच्या दक्षिणेला असलेले कर्नवडी हे गाव वेल्हे आणि महाड तालुक्याच्या हद्दीवरील गाव आहे. अतिदुर्गम प्रदेशात असलेल्या या गावात जाण्यासाठी वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीचा कडा पायी उतरून जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही, कोणतेही वाहन तेथे जाऊ शकत नाही,
गावामध्ये गेली 4 दिवस पडत असलेल्या पावसाने भेगा पडून घरांना तडे गेले होते. 24 जुलै रोजी मी स्वतः, तहसीलदार शिवाजी शिंदे आणि केळद’चे सरपंच रमेश शिंदे यांनी गावास भेट देऊन स्थलांतरित होण्याबाबत ग्रामस्थांना सूचना दिल्या होत्या. मात्र लोक स्थलांतरित होण्यासाठी तयार नव्हते. 25 जुलै रोजी रात्री 1.30 च्या सुमारास सह्याद्रीचा कड्याचा मोठा भाग कोसळून मोठा आवाज झाला, काही घरातील भांडी पडली, लोक घरातून बाहेर पडले, याची माहिती मिळाल्यानंतर 26 जुलै रोजी तहसीलदार शिवाजी शिंदे , सहायक पोलिस निरीक्षक पवार, पोलिस स्टाफ, गट विकास अधिकारी विशाल शिंदे, पंचायत समिती सभापती दिनकर धरपाळे, तालुका काँग्रेस अध्यक्ष नाना राऊत, केळद गावचे सरपंच रमेश शिंदे, तलाठी, मंडळ अधिकारी ग्रामसेवक यांनी भेट दिली असता, घरांचे तडे आणि जमिनीच्या भेगा वाढल्याचे दिसून आले. हवामान खात्याने दिलेला अतिवृष्टीचा इशारा पाहता सुरक्षेचा उपाय म्हणून त्या गावातील सर्व लोकांना स्थलांतरित केले आहे. त्यामध्ये रानवडी तालुका महाड येथे 32 कुटुंब 130 व्यक्ती, बिरवाडी तालुका महाड येथे 2 कुटुंब 6 व्यक्ती, शिवथरघळ तालुका महाड येथे 1 कुटुंब 3 व्यक्ती, निगडे खुर्द तालुका वेल्हे येथे 1 कुटुंब 9 व्यक्ती, केळद तालुका वेल्हे येथे 1 कुटुंब 5 व्यक्ती असे एकूण 37 कुटुंब 153 व्यक्तींना स्थलांतरित केले आहे. सर्वांची सोय शाळा, मंदिर, नातेवाईक अश्या विविध ठिकाणी केली आहे, त्यांची जेवणाची सोय केली आहे.
तसेच जेसीबीच्या मदतीने कर्णवडी ते रानवडी या रस्त्याची डागडुजी करण्यात आलेली आहे.”