October 8, 2025

Pune: मौजे निंबुत येथील आरोग्य शिबिरात अडीच हजार नागरिकांची तपासणी

पुणे, ७ आॅक्टोबर २०२५ : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे आणि भारतीय जनता मजदूर सेल यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे निंबुत (ता. हवेली) येथे मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले.

ग्रामीण जनतेसाठी आयोजित या शिबिरात नेत्र, दंतरोग, स्त्रीरोग, हृदयरोग, हाडांचे आजार, कर्करोग निदान व आयुर्वेदिक उपचार अशा विविध विभागांतील तपासण्या आणि उपचार पूर्णपणे मोफत करण्यात आले. या शिबिरात सुमारे अडीच हजार नागरिकांनी लाभ घेतला, ज्यामध्ये स्त्रिया, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्गाचा समावेश होता.

मुख्य समन्वयक डॉ. मानसिंग साबळे यांनी उत्कृष्ट नियोजन करून शिबिर यशस्वी केले. त्यांनी सांगितले की, “आरोग्य सर्वांसाठी ही भावना जनतेपर्यंत पोहोचवणे आणि गरीब, गरजू जनतेला विनामूल्य उपचार देणे हा शिबिराचा उद्देश होता.”

शिबिराचे उद्घाटन सौ. ज्योतीताई सावर्डेकर यांच्या हस्ते झाले. प्रमुख आयोजक सुरज तोडकर आणि सुजित काकडे होते. ग्रामस्थांच्या सहभागामुळे शिबिर यशस्वी ठरले. या उपक्रमातून मौजे निंबुत परिसरात आरोग्य जागरूकतेचा सुंदर संदेश पसरला.