December 2, 2025

Pune: महापालिकेच्या प्रारूप आरक्षण सोडतीवर २६ हरकती

पुणे, २४ नोव्हेंबर २०२५ : पुणे महापालिकेेच्या प्रारूप आरक्षणावर २६ हरकती आणि सूचना आल्या आहेत. त्यात पालिकेच्या १६५ जागांपैकी ओबीसीसाठी २७ टक्क्यांप्रमाणे ४४.५५ जागा म्हणजे ४५ जागा निश्चित होणे अपेक्षित होते; पण प्रत्यक्षात एससीसाठी २१ ऐवजी २२ जागा देण्यात आल्या आहेत. ओबीसीसाठी ४५ जागांऐवजी ४४ जागा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ओबीसी प्रवर्गाची एक जागा कमी करण्यात आली आहे. या प्रमुख हरकतींचा समावेश आहे.

पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नगरसेवकांची संख्या १६५ असून, ४१ प्रभाग आहेत. त्यापैकी ४० प्रभाग चार सदस्यीय, तर ३८ क्रमांकाचा आंबेगाव – कात्रज प्रभाग पाच सदस्यीय आहे. १६५ नगरसेवकांच्या जागांपैकी ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे ८३ नगरसेविका आणि ८२ नगरसेवक असणार आहेत. अनुसूचित जातींसाठी (एससी) २२, तर अनुसूचित जमातींसाठी (एसटी) २ जागा आरक्षित आहेत, तसेच ओबीसींसाठी ४४ जागा राखीव आहेत. प्रारूप आरक्षणासाठी ११ नोव्हेंबर रोजी सोडत काढण्यात आली. त्यानंतर १७ नोव्हेंबर रोजी प्रारूप आरक्षण सोडत प्रसिद्ध केली. त्या दिवसापासून हरकती आणि सूचना नोंदविण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी, २४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत हरकती आणि सूचना नोंदविण्याची अंतिम मुदत होती. हरकती, सूचना महापालिका मुख्यालय, निवडणूक कार्यालय किंवा पालिकेच्या प्रभाग कार्यालयात नोंदविता आल्या आहेत. महापालिकेेच्या प्रारूप आरक्षणावर २६ हरकती आणि सूचना आल्या आहेत. त्यातील योग्य हरकती आणि सूचनांचा विचार करून २ डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण सोडत जाहीर होणार आहे.