पुणे: चेन्नई एक्सप्रेसमधून विदेशी २७९ कासवे, १हजार २०७ इग्वाना सरडे, २३० बेटा फिश लोहमार्ग पोलिसांकडून जप्त

पुणे, दि. २६ मे २०२१: रेल्वे प्रवास करून आंतरराष्ट्रीय प्राण्यांची तस्करी करणाऱ्या दोघांना लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अटक केली. त्यांच्याकडून विदेशी २७९ कासवे, १ हजार २०७ इग्वाना सरडे, २३० बेटा फिश जप्त करण्यात आली आहेत. तरुणकुमार मोहन (वय २६, रा. लेनीननगर, अंबतूर, चेन्न्ई) आणि श्रीनिवासन कमल (वय २०, रा. कोल्लातूर, तामिळनाडु) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ते चेन्नईहून मुंबईला हे प्राणी घेऊन जात होते. त्यानंतर ते परदेशात पाठवणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आरोपी प्राण्यांची वाहतूक कशासाठी करत होते? यामध्ये इतर कोण सहभागी आहे, याचा तपास पोलिस करत आहेत.

लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे गाड्यांतून विनापरवाना मालाची व प्राण्यांची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती लोहमार्ग पोलिस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक माैला सय्यद यांना सुचना देऊन रेल्वेगाड्यांवर पेट्रोलिंग करण्यास सांगितले होते. त्यानुसार मागील आठ ते दहा दिवसापासून पथके गस्तीवर होती. दरम्यान पुणे ते लोणावळा प्रवासात चेन्नई एल टी टी एक्सप्रेसमधील ए/१ बोगीमधून प्रवास करणारे दोघे संशयास्पदरित्या आढळून आले. त्यांच्याकडे चाैकशी करून ४ ट्रॅव्हल बॅगा व दोन सॅगबॅगची तपासणी केली असता, त्यामध्ये कासव, इग्वाना जातीचे प्राणी व फायटर फिश आढळून आल्या. त्यांना प्राण्यांची वाहतूकीबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा वाहतूक परवाना व कागदपत्रे नसल्याने दोघांना त्यांच्या बँगांसह ताब्यात घेण्यात आले.

एवढ्या मोठ्या प्रमाणात प्राणी आढळल्यामुळे ते कोणत्या जातीचे व संख्या किती आहे हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी वनाधिकारी व कर्मचाऱ्यांची मदत घेतली. बावधन येथील रेक्यू चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, ही आफ्रिकन स्पुरेंड टॉर्टोइस जातीची कासवे आहेत. इग्नावा हा सरड्यासारखा प्राणी आहे. या तस्कारांकडे २७९ कासवे, १२०७ इग्वाना, २३० बेटा फिश आढळून आले आहे. त्यांच्या सरंक्षणासाठी त्यांना तेथेच जमा करण्यात आले आहेत.हे प्राणी परदेशी प्रजातीचे असल्याने व या तस्करांनी कोणतेही सीमा शुल्क विभागाची परवानगी न घेता वाहतूक केल्याने दोघांना पुढील कारवाईसाठी सीमा शुल्क विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. या तस्करांनी हे प्राणी प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये ठेवले होते. त्यांनी प्लॅस्टिक कंटनेरला भोके पाडली होती.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक सदानंद वायसे -पाटील, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर -पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्ष मौला सय्यद, सहायक निरीक्षक अंतरकर, सहायक फौजदार सुनिल भोकरे, जगदीश सावंत, कर्मचारी सुनिल कदम, सुहास माळवदकर, दिनेश बोरनारे, फिरोज शेख यांच्या पथकाने केली.

 

Read In English : Pune: Two Animal Smugglers Arrested With 279 African Turtles, 1,207 Iguana Lizards, 230 Betta Fish