September 11, 2025

Pune: खडकवासल्यातून ३५ हजार क्युसेक विसर्ग; एकतानगरी जलमय होण्याच्या मार्गावर

पुणे, १९ आॅगस्ट २०२५ : खडकवासला धरणातून तब्बल ३५,५७४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून शहरातील नदीकाठच्या वस्त्यांत पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. प्रशासन नागरिकांना “सर्व काही नियंत्रणात” असल्याचे सांगत असले, तरी प्रत्यक्षात सिंहगड रस्ता परिसरातील एकतानगरी परिसरात पुरामुळे ओढ्याचे तुंबलेले पाणी सोसायट्यांत घुसले आहे. अनेक कुटुंबे बेघर झाली असून, नागरिकांचे स्थलांतर सुरू आहे.

धरणाच्या उर्ध्व परिसरात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे विसर्ग आणखी वाढू शकतो. त्यातच धरणाखालच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे नदीत अतिरिक्त प्रवाह येत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शहरात वाहणारे पाणी धरणाच्या विसर्गापेक्षा जास्त असून पूरपातळी झपाट्याने वाढत आहे.

सिंहगड रोडवरील आनंदनगरातील एकतानगर भागात बॅकवॉटरचा फुगवटा तयार झाला आहे. नदीची पातळी वाढल्याने ओढ्यातील पाणी नदीत मिसळू शकले नाही आणि उलटे फिरून वस्त्यांमध्ये शिरले. परिणामी जलपूजन, शामसुंदर, द्वारका, राज, साई सिद्धार्थ या सोसायट्यांत पाणी शिरले असून तळमजल्यातील घरे आणि दुकाने रिकामी करावी लागली आहेत.

महापालिका आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज असल्याचे सांगण्यात येत असले, तरी नागरिकांची पुरती तारांबळ उडाली आहे. प्रशासनाने सन सिटी रस्त्यावरील बॅडमिंटन सभागृहात स्थलांतराची सोय केली असली, तरी पुराचा धोका वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

नदीकाठच्या वस्त्यांतील वास्तव आणि प्रशासनाचे आश्वासन यातील तफावत आता उघड झाली आहे. पाऊस सुरूच राहिला तर परिस्थिती अधिक गंभीर होण्याची चिन्हे आहेत.