पुणे: पॅरोल मंजूर होऊनही ‘यासाठी’ ५३ कैद्यांनी दिला नकार

पुणे, २० जुलै २०२१ – तुरूंगाची हवा भल्याभल्या गुन्हेगारांना वठणीवर आणते. त्यामुळे एकदा शिक्षा भोगून आल्यानंतर पुन्हा कारागृहाचे नाव जरी काढले तरी त्यांना कापरे भरते. मात्र, राज्यातील विविध कारागृहातील सुमारे ५३ कैद्यांनी पॅरोल मंजूर होऊनही, घरी न जाण्याचा निर्णय घेतला आहे.


कोरोनाने थैमान घातले असताना राज्यभरातील कारागृह प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना केल्या होत्या. विशेषतः लसीकरणाला प्राधान्य देऊन बाधितांची संख्या कमी करण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे विविध कारागृहातील कैद्यांना सुरक्षिततेचा चांगलाच अंदाज आला.


सोयी-सुविधा, कोरोना लसीकरण, खाद्यपदार्थांची चंगळ, सुरक्षितता या बाबी लक्षात घेत, पॅरोल मंजूर होऊनही संबंधित कैद्यांनी घरी जाण्यास नकार दिला आहे. त्याचबरोबर कारागृहातून सुटल्यानंतर पूर्ववैमनस्यामुळे झालेल्या वादातून खुनापर्यंतच्या घटना घडल्या आहेत. त्याशिवाय टोळीयुद्ध, पुन्हा कारागृह, नव्याने दुसऱ्या गुन्ह्यातील खटला सुरू झाल्यामुळे गुन्हेगारांना मनस्तापाला सामोरे जावे लागते. त्या पार्श्वभूमीवर पॅरोल नाकारून ५३ कैद्यांनी कारागृहाच्या सुरिक्षततेवर शिक्कामोर्तब केले आहे.


पॅरोल मंजूर होऊनही ५३ कैद्यांनी कारागृहातच राहण्यास पसंती दिली आहे. आमची सुरक्षितता कारागृहात जास्त असल्याचे कैद्यांकडून सांगितले जाते. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित कैद्यांना जाण्यास आग्रह प्रशासनाकडून करण्यात येत नाही, असे अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी सांगितले.