पुणे, ८ जुलै २०२५: चांदणी चौक येथील बावधन खुर्द सर्व्हे नंबर १९ आणि २० मधील जागेत ६० फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. ‘हिंदवी स्वराज्यनिर्मिती शिल्प’ या नावाने उभारल्या जाणाऱ्या या स्मारकासाठी २९ कोटी रुपयांच्या पूर्वगणनपत्रकास पुणे महापालिकेच्या एस्टीमेट कमिटीने मंजुरी दिली आहे. हा पुतळा पुणे शहरातील सर्वांत उंच पुतळा ठरणार आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रकल्पाला अंतिम स्वरूप देण्यात आले. चांदणी चौकाकडून वारजेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या आणि साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गाच्या सेवा रस्त्याच्या मधोमध सुमारे ५,५४२ चौरस मीटर क्षेत्र उपलब्ध आहे. याच ठिकाणी हा भव्य स्मारक प्रकल्प साकारण्यात येणार आहे.
प्रारंभी १७ फूट उंचीच्या चौथऱ्यावर २० फूट उंच पुतळ्याचे नियोजन होते. स्टोन क्लॅडिंगसह भव्य प्रवेशद्वार, कमळाच्या पाकळ्यांसारखी कारंजे, स्टोन पदपथ, छोटे प्रवेशद्वार, आरसीसी रिटेनिंग वॉल व सीमा भिंत, तसेच उर्वरित भागात उद्यान विकासाचे काम अशी संकल्पना तयार करण्यात आली होती. यासाठी ६ कोटी ५६ लाख रुपयांच्या निविदेस मंजुरीही देण्यात आली होती.
मात्र, शिवप्रेमींच्या मागणीनंतर आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सूचनेनुसार, ६० फुटी ब्राँझ धातूचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा सुधारित प्रस्ताव तयार करण्यात आला. या नव्या प्रस्तावानुसार ३० फूट उंच चौथरा आणि त्यावर ६० फूट उंच पुतळा उभारण्यात येणार असून, यासाठी एकूण २९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हे संपूर्ण काम एकाच ठेकेदारामार्फत करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या भवन विभागाचे अधीक्षक अभियंता रोहिदास गव्हाणे यांनी दिली.

More Stories
Pune: मला कुठलीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी मोजायला मी तयार – माजी आमदार रवींद्र धंगेकर
HND जैन बोर्डिंगचे विश्वस्त श्री जयंत नांदुरकर यांना आचार्य श्री गुप्ती नंदीजी यांनी खडेबोल सुनवत खरेदी व्यवहार रद्द करण्यास सांगितले
Pune: जैन बोर्डिंग प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, मुख्यमंत्र्यांनी जैन बोर्डिंगसाठी १०० कोटी जाहीर करावे – धंगेकर