पुणे: रस्ते दुरूस्तीसाठी राहिले ७ दिवस, नालेसफाई देखील अर्धवटच

पुणे, ३/०६/२०२१: शहरातील रस्ते खोदून ठेवल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, तर दुसरीकडे पावसाळा पूर्वीची पावसाळी गटारे, चेंबर्स, नाले सफाईचे काम देखी अद्याप अपूर्णच आहे. हे सर्व कामे १० जून पर्यंत पूर्ण करण्याचे आश्‍वासन प्रशासनाने दिले असून, त्यासाठी ७ दिवस शिल्लक आहेत.

शहरातील सांडपाणी वाहिनी, समान पाणी पुरवठा यांच्यासाठी रस्तेखोदाई केली आहे. तसेच पावसाळ्यापूर्वीची नाले सफाई, पावसाळी गटारांची स्वच्छताही सुरू करण्यात आली. त्यासाठी कोट्यावधी रुपयांची निविदा देखील काढण्यात आल्या. ही कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करणे अपेक्षीत होते. मात्र, प्रशासनाला हे काम गतीने करण्यात अपयश आले.

शहराच्या मध्यवर्ती भागातील बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता लक्ष्मी रस्ता, नारायण पेठ भागातील सर्वच रस्ते एकाच वेळी खोदून ठेवले आहेत. पर्यायी रस्ते उपलब्ध नसल्याने रुग्णवाहिकांसह इतर वाहने कोंडीत सापडत आहेत. शहरातील नव्याने रस्तेखोदाई बंद झाली असली तरी ज्या ठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत, तेथील स्थिते अद्यापही सुधारणा झालेली नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
पावसाळ्यात पाणी तंबु नये म्हणून पावसाळी गटारे स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले पण १ जून पर्यंत ३० हजार १९ चेंबर्स पैकी २१ हजार ३५८ साफ झाले. १४५ किलोमिटर पावसाळी गटारांपैकी ५९ टक्के म्हणजे ८६ किलोमिटरचे काम पूर्ण झाले, ४१ टक्के काम अपूर्ण आहे. शहरातील ८३ धोकादायक ठिकाणचे काम झाले आहे, हे काम आता १० जून पर्यंत पूर्ण करण्याची मुदत दिली आहे.

‘‘जुन्या सांडपाणी वाहिन्या बदलने आवश्‍यक होते त्यासाठी काम हाती घेण्यात आले. पण आता नागरिकांना त्रास होत असल्याने लवकर रस्ते दुरस्त झाले पाहिजेत. पर्यायी रस्ते प्रशासनाने उपलब्ध करून द्यावेत असे आदेश दिले आहेत. ८ ते १० जून पर्यंत शहरातील रस्ते दुरूस्त होतील.’’ गणेश बीडकर, सभागृहनेते