पुणे : मेट्रोसाठी मंडईतील दुकाने हटविली; ७० जणांचे पुनर्वसन

पुणे,दि.२९ मे २०२१ः महात्मा फुले मंडई येथे भूमीगत मेट्रोचे स्थानकाचे काम सुरू होणार असल्याने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने या मंडई इमारतीच्या परिसरातील दुकान हटवून हा परिसर रिकामा केला.

महामेट्रोतर्फे स्वारगेट ते शिवाजीनगर या दरम्यान भूमीगत मेट्रोचे काम सुरू आहे. मंडई परिसरात मेट्रो स्थानक येणार आहे, त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून तेथील व्यवसायिकांचे इतरत्र स्थलांतर करण्यासाठी चर्चा सुरू होती. मंडईतील व्यावसायिकांनी त्यांचे व्यवस्थित पुनर्वसन व्हावे साठी आग्रही होते. महापालिकेने हुतात्मा बाबू गेनू वाहनतळ आणि काका हलवाई दुकानामागील जागेत किराणा दुकानदार, फळविक्रेते, पान विक्रेते यासह इतरांसाठी गाळे बांधले आहे. या व्यावसायिकांनी तेथे जावे यासाठी महापालिकेने शनिवारी सकाळी पोलिस बंदबोस्तामध्ये दुकाने हटविण्याची कारवाई सुरू केली. महापालिकेने व्यावसायिकांना विश्‍वासात न घेता, नोटीस न देता कारवाई केली आहे. याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा व्यावसायिकांनी दिला असून, महापालिका प्रशासनाचा निषेध केला आहे.

याबाबत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप म्हणाले,‘‘मंडईत मेट्रो स्टेशन होणार असल्याने या भागातील अधिकृत किराणा, फळविक्रेते, पान विक्रेते या ७० दुकानदारांचे पुनर्वसन करण्यासाठी गाळे बांधले आहेत. त्याचे वाटप करण्यात आले आहे. या ठिकाणी काम सुरू होणार असल्याने ही जागा शनिवारी सकाळी कारवाई करून रिकामी करण्यात आली आहे. कारवाई करताना सर्व कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले आहे.’’

‘‘मेट्रोचे काम सुरू होणार असल्याने मेट्रोच्या आराखड्यानुसार आमचे पुनर्वसन करा आम्ही सहकार्य करतो असे सांगितले होते. तरीही आज सकाळी नोटीस किंवा पूर्वसूचना न देता कारवाई करण्यात आली. महापालिकेचे अधिकारी, राजकीय नेते व पोलिसांनी संगनमत करून ही कारवाई केली आहे. याविरोधात न्यायालयात जाणार आहोत, असे मंडई गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ काची यांनी सांगितले.