October 27, 2025

पुणे: कर थकविणाऱ्या ७५ मिळकती सील, अठरा दिवसात ४० कोटींची वसूली

पुणे, १९ डिसेंबर २०२४ : शहरातील मिळकतकर थकबाकीदारांच्या विरोधात कर संकलन विभागाकडून थकबाकीदारांच्या दारात बॅंड वाजविण्यासह, मिळकती सील करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत मागील अठरा दिवसात कर संकलन विभागाने तब्बल ७५ मिळकती सील करून ताब्यात घेतल्या आहेत तर सुमारे ३१७ मिळकतधारकांकडून ४० कोटी ६८ लाख रूपयांचा कर वसूल करण्यात आला आहे. महापालिकेच्या कर संकलन विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी ही माहिती दिली.

महापालिकेकडून शहरातील सुमारे १४ लाख ८० हजार मिळकतधारकांना २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी मिळकतकराची बिले पाठविण्यात आली असून त्यातील ८ लाख ८४ हजार मिळकतधारकांकडून आता पर्यंत सुमारे १८४१ कोटी रूपयांचा कर वसूल करण्यात आला आहे. तर उर्वरीत सहा लाख मिळकतधारकांनी अद्यापही कर भरलेला नाही. त्याच वेळी या विभागास या वर्षीच्या अंदाजपत्रकात २७२७ कोटींचे कर वसूलीचे उदिष्ठ देण्यात आले असून आर्थिक वर्षाचे शेवटचे तीन महिने शिल्लक असतानाच अद्यापही ८५० कोटींच्या वसूलीचे उद्दीष्ठ अद्याप बाकी आहे. त्यामुळे कर संकलन विभागाकडून शहरात आक्रमक भूमिका घेत मिळकतींच्या समोर बॅंड वाजविणे तसेच मिळकती सील करण्याची कारवाई सुरू केलेली आहे. त्यातून दिवसाला दोन ते अडीच कोटींची वसूली होत असल्याचे चित्र आहे.