September 11, 2025

Pune: शहरात ८८ अनधिकृत होर्डींग २४ होर्डींग काढले

पुणे, २४ जुलै २०२५: महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत जाहीरात फलक शोधण्यासाठी नेमण्यात आलेल्या पथकाने येरवडा- कळस- धानोरी, नगररोड वडगावशेरी, हडपसर-मुंढवा तसेच वानवडी – रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत तब्बल ८८ अनधिकृत होर्डींग शोधून काढले आहेत. मात्र, हे होर्डींग काढण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांकडून टाळाटाळ सुरू असून गेल्या काही दिवसात अवघे २४ जाहीरात फलक काढण्यात आले आहेत, तर काही फलक उभारण्य़ात आलेले असले तरी महापालिकेकडे मान्यतेसाठी त्यांचे अर्ज आहेत असे कारण देत ही कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे समोर आले आहे.

महापालिका आयुक्तांनी दोन महिन्यांपूर्वी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना अनधिकृत होर्डींगची माहिती मागवण्यात आली होती. त्यावेळी १४ क्षेत्रीय कार्यालयांनी त्यांच्याकडे केवळ २४ अनधिकृत होर्डींग असल्याचे कळविले. ही बाब खटकणारी असल्याने आयुक्तांनी आकाशचिन्ह विभागास स्वतंत्र पथक नेमून पुन्हा एकदा तपासणी करण्याचे आदेश दिले होते. या तपासणीत येरवडा- कळस- धानोरी, नगररोड वडगावशेरी, हडपसर-मुंढवा तसेच वानवडी – रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ८८ अनधिकृत होर्डींग आढळले. त्यामुळे आयुक्तांच्या आदेशानुसार नगररोड वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या परवाना निरिक्षकास निलंबित करण्यात आले आहे. तर येरवडा- कळस- धानोरी क्षेत्रीय कार्यालयाच्या लिपिकास निलंबित करण्यात आले आहे. तर, इतर क्षेत्रीय कार्यालयांना नोटीसा देण्यात आल्या असून तातडीनं होर्डींग काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, त्यातील केवळ २४ होर्डींग काढण्यात आले आहेत.

“सर्व क्षेत्रीय कार्यालयांना तातडीनं अनधिकृत होर्डींग काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, कारवाई न झाल्यास सर्व संबधितांवर कारवाई केली जाईल. तसेच त्यांना आवश्यक असलेली यंत्रणाही उपलब्ध करून दिली जाईल.” – पृथ्वीराज बी.पी., अतिरिक्त आयुक्त, महापालिका