पुणे: अश्लील शिव्या देणार्या थेरगावच्या क्वीनवर गुन्हा दाखल

थेरगाव, ३०/०१/२०२२: इंस्टाग्राम या सोशल मीडिया साइटवर अश्लील शिव्या देऊन व्हिडिओ तयार करणाऱ्या व थेट खुनाची धमकी देणाऱ्या तथाकथित थेरगाव क्वीन नावाने अकाउंट चालणारी तरुणी व तिच्या मित्र, मैत्रिणीवर वाकड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गेल्या काही दिवसांपासून तिचे शिवीगाळ केलेली व्हिडीओ व्हायरल होत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

“Thergaon-QueenN” या नावाचे अकाऊंट चालविणारी साक्षी हेमंत श्रीश्रीमल (रा. थेरगांव,पुणे), कुणाल कांबळे (रा. गणेशपेठ), साक्षी राकेश कश्यप (रा. चिंचवड, पुणे) या तिघांवर भादंवि कलम २९२, २९४, ५०६, ३४ सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. उप निरीक्षक संगिता जिजाभाऊ गोडे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उप निरीक्षक गोडे यांच्या मोबाईलवर काही इंन्स्ट्राग्राम व्हिडीओ प्राप्त झाले, त्यामध्ये इन्स्ट्राग्राम अकाऊंट Thergaon-
QueenN या नावाचे अकाऊंट चालविणारी साक्षी श्रीश्रीमल हिने तिच्या सोबत तिचा मित्र कुणाल कांबळे व मैत्रीण साक्षी राकेश कश्यप यांना सोबत घेऊन सार्वजनिक ठिकाणी अश्लिल भाषा व शब्द वापरलेले व्हिडीओ
तयार केले. तसेच धमकीवजा व्हिडीओ बनवुन ते स्वतःचे इन्स्ट्राग्राम या सोशल
मिडीया अकाऊंटवरती शेअर केले. त्यामुळे सदरचे व्हिडीओ पाहुन व ऐकुन समाजातील मुलामुलींची नितीभ्रष्ट होण्यास व मानसिक स्थीती बिघडविण्यास वरील नमुद आरोपी हे कारणीभुत होत आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी Thergaon-QueenN साक्षी सह हेमंत व साक्षी यांच्या विरोधात तक्रार दिल्याने
वरीलप्रमाणे गुन्हा नोंद आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक
संभाजी जाधव करत आहेत.

हजारो व्हिवर आणि लाईक
साक्षी ही थेरगाव पिंपरी चिंचवड भागातील उद्यानांमध्ये, रस्त्यावर व्हिडिओ बनवत असत. त्यामध्४ शिव्यांची लाखोली वाहत होतीच, शिवाय अश्लील शब्दांचा वापर करत. गेल्या काही दिवसांपासून तिच्या या व्हिडिओवर टीका होत होती, तर तिचे मित्र समर्थनार्थ व्हिडिओ तयार करत होते. त्यामुळे सोशल मीडियावर कमेंट्स वाॅर सुरू झाल्याचे चित्र पहायला मिळत होते. मात्र, या तिच्या व्हिडिओला हजारो व्हिवर व लाईक मिळत असल्याने हा चिंतेचा विषय ठरला होता. तिच्या एका व्हिडिओ मध्ये “मी झाले शिव्या देऊन फेमस, मग द्या तुम्ही शिव्या आणि व्हा फेमस.” यासह इतर आव्हान देणारे व्हिडिओ इंस्टाग्राम, फेसबुक रीलवर व्हायरल झाले आहेत.