October 22, 2025

पुणे: ५० लाखांची लाच मागणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकासह दोन जणांवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे, १९ एप्रिल २०२५: हडपसर येथील जमीन मोजणीसंदर्भात 50 लाख रुपयांची लाच मागणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक व भुकरमापकावर येरवडा पोलिसांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पुण्यातील व्यवसायिकाने तक्रार दिल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कुणाल चंद्रशेखर अष्टेकर (वय ४१, रा. शिवाजीनगर, पुणे) यांनी हडपसरमधील एका जमिनीची मोजणी २०२३ व २०२४ मध्ये भूमी अभिलेख कार्यालय, हवेली, पुणे यांच्याकडून अधिकृतपणे करून घेतली होती. मात्र, हद्द निश्चितीसाठी २०२४ सालात उपअधीक्षक अमरसिंह रामचंद्र पाटील आणि भुकरमापक किरण येटाळे यांनी मिळून तक्रारदाराकडे ५० लाख रुपयांची लाच मागितली.

त्यानंतर किरण येटाळे यांनी लाच रक्कम २५ लाखांवर आणल्याचे सांगत, ती रक्कम न दिल्यास अमरसिंह पाटील ‘हेलिकॉप्टर शॉट’ लावतील अशी धमकी दिली. या धमकीमुळे तक्रारदारावर आर्थिक दबाव आणण्यात आला. लाच न दिल्यामुळे आरोपींनी तक्रारदाराच्या शेजारील जमीन धारकांची चुकीची ‘क’ प्रत तयार करून त्यांच्या मालमत्तेला नुकसान पोहोचवले.

या प्रकरणी १८ एप्रिल रोजी भारतीय न्याय संहिता कलम ३०८(२), १९८, २०१ तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ चे कलम ७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. सहायक पोलीस आयुक्त मच्छींद्र खाडे हे पुढील तपास करीत आहेत.