पुणे: शॉर्टसर्किटमुळे महात्मा फुले मंडईच्या छताला लागली आग

पुणे, १०/०६/२०२१: शॉर्टसर्किटमुळे महात्मा फुले मंडईच्या जुन्या वास्तुतील इमारतीत काल मध्यरात्री आग लागली. त्यामुळे छताचा काही भागासह दोन गाळ्यांना आगीची झळ पोहोचली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन वीस मिनिटात आग आटोक्यात आणली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

महात्मा फुले मंडईची जुन्या वास्तुला वारसा आहे. गुरूवारी मध्यरात्री मंडईतील लाकडी छतातून मोठ्या प्रमाणावर धूर येत असून आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य केंद्राला मिळाली. आग लागल्याची माहिती मिळताच तातडीने तीन बंब आणि टँकर घटनास्थळी दाखल झाले. जुन्या वास्तुचे छत कौलारू आहे. त्यामुळे अंतर्गत भागातील लाकडांना लागलेले आग आटोक्यात आणण्यासाठी जवानांनी शिडीचा वापर केला. शिडीवरून पाईप वर नेण्यात आले. चारही बाजूने पाण्याचा मारा करण्यात आला. वीस मिनिटात आग आटोक्यात आणली. आग आटोक्यात आल्यानंतर अग्निशमन दलाच्या पथकाने अंतर्गत भागाची पाहणी केली. आग पूर्णपणे आटोक्यात आल्यानंतर मदतकार्य थांबविण्यात आले, असे अग्निशमन दलातील केंद्रप्रमुख प्रदीप खेडेकर यांनी सांगितले.

आग आटोक्यात आल्यानंतर छताची पाहणी करण्यात आली. अंतर्गत भागात जुन्या वायरी आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. केंद्रप्रमुख प्रदीप खेडेकर यांच्या नेतृत्त्वाखाली अतुल मोहिते, प्रदीप पवार, मनीष बोंबले, अजीम शेख, स्वप्नील टुले, सुधीर नवले आदींनी आग आटोक्यात आणली. जुन्या वास्तुतील दोन गाळ्यांना आगीची झळ पोहोचली असून तेथे ठेवण्यात आलेल्या आंब्यांच्या रिकाम्या पेट्यांना आग लागली.

महात्मा फुले मंडईची देखणी जुनी वास्तू ब्रिटीशकालीन आहे. वारसा असलेल्या या वास्तुत मोठ्या प्रमाणावर लाकडी बांधकाम आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने आग आटोक्यात आणल्याने या इमारतीला झळ पोहचली नाही.