पुणे: कोंढव्यात वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळीला अटक

पुणे, 14 जून 2021 : – पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलावर उलट्या कोयत्याने वार करून परिसरातील आठ वाहनांची तोडफोड करणाऱ्या पाच जणांना कोंढवा पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली आहे. ही घटना दोन दिवसांपुर्वी कोंढवा-बुद्रुक परिसरातील श्रद्धानगरमध्ये घडली होती. सुरज यादवराव रसाळ (वय19,रा. उंड्री), स्वप्नील उर्फ अनिकेत नितीन कणसे (वय 19, रा. कोंढवा बुद्रूक), ओमकार सचिन शेंडगे (वय 19, रा. होळकरवाडी), नितीन एकनाथ पाटील (वय 20, रा. उंड्री), किरण नामदेव जाधव (वय 19, रा. मरळचाळ, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रेम यादव यांनी तक्रार दिली आहे.

फिर्यादी प्रेम आणि आरोपी सुरज यांची शाळेत असल्यापासून भांडणे आहेत. त्याचा राग मनामध्ये धरून आरोपींनी 12 जूनला प्रेमचा दुचाकीवर पाठीलाग केला. त्यावेळी पावसाचे पाणी प्रेमच्या अंगावर उडाल्यामुळे त्याने जाब विचारला. त्याचा राग आल्यामुळे टोळक्‍याने प्रेमवर उलट्या कोयत्यासह तलवारीने मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यानंतर प्रेम त्याठिकाणाहून निघून घरी गेला. आरोपींनी मरळचाळ परिसरात जाउन 8वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण केली .

शाळेत असल्यापासून फिर्यादी आणि आरोपी यांच्यामध्ये वादावादी होत होती. त्याचा राग मनामध्ये धरून आरोपींनी प्रेम यादव याच्यावर हल्ला करून परिसरातील वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी पाचही आरोपींना चार तासामध्ये अटक करण्यात आले असल्याचे कोंढवा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक स्वराज्य पाटील यांनी सांगितले.