पुणे: पैशांचा पाउस पाडून दाखवितो असे सांगून व्यावसायिकाला लुटणाऱ्या भोंदूला अटक, तब्बल ५२ लाखांची केली फसवणूक

पुणे, ३/०६/२०२१: जादूटोणा करून तरूण व्यावसायिकाला पैशांचा पाउस पाडून दाखवितो असे सांगत वेळोवेळी तब्बल ५२ लाखांचा गंडा घालणाऱ्या भोंदू मांत्रिकाला गुन्हे शाखेच्या युनीट तीनने जालनामधून अटक केले. किसन आसाराम पवार असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका तरूणाने गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदविली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरूण पुण्यातील व्यावसायिक असून त्याच्या मित्राने भोंदू किसन पवारची ओळख करून दिली होती. त्यानंतर आरोपी किसने तरूणाला पैशांचा पाउस पाडून दाखवितो, त्यासाठी तुम्हाला पूजा घालावी लागेल असे सांगितले. पैशांचा पाउस पाडण्यासाठी पुजेमध्ये पैसे ठेवावे लागतात असे सांगत किसनने दैवी शक्ती असल्याचे तरूणाला भासविले. त्यानुसार वेळोवेळी पूजा घालण्यासाठी भोंदू मांत्रिक किसनने तरूणाकडून तब्बल ५२ लाख रूपये उकळले होते. त्यानंतरही पैशांचा पाउस पडला नसल्यामुळे तरूणाने पैसे देणे बंद केले. त्यावेळी आरोपी किसनने तुमचे काम झाले आहे, फक्त शेवटाचा विधी करावा लागेल असे सांगितल्यामुळे तरूणाचे मानसिक संतुलन बिघडले. त्यानंतर त्यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार दिली.

पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली असता, भोंदू किसन जादूटोणा करीत असल्याचे उघडकीस आले. त्यानुसार पोलिसांनी त्याला जालन्यातील मठा तालुक्यामधून हिवरखेड गावातून ताब्यात घेत अटक केली. नागरिकांनी जादूटोणासह अंधश्रद्धेवर विश्वास ठेउ नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, सहायक पोलीस निरीक्षक अमृता चवरे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, दीपक मते, महेश निंबाळकर, राजेंद्र मारणे, संदीप तळेकर, दीपक क्षीरसागर, प्रकाश कट्टे, सुजीत पवार, संतोष क्षीरसागर, विल्सन डिसोझा, कल्पेश बनसोडे, रामदास गोणते, सोनम नेवसे यांच्या पथकाने केली.