पुणे: वीज वाहिनीचा धक्का बसून शाळकरी मुलगा ठार

पुणे, दि.31/10/2022-   उच्च दाब वीज वाहिनीचा धक्का लागून गंभीर जखमी झालेल्या शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी ( दि. ३०) सकाळी कात्रज मध्ये घडली .
ऋषिकेश मंजुनाथ  पुजारी ( वय१४, रा. कर्वेनगर) असे ठार झालेल्या  मुलाचे नाव आहे.
कर्वेनगरला राहणारे मंजुनाथ पुजारी हे सिंहगड रोड परिसरातील एका दुकानात फर्निचरचे काम करतात. २३ ऑक्टोबरला  कामानिमित्त ते कात्रजला आले होते. शाळेला सुट्टी असल्याने त्यांचा मुलगा  ऋषिकेशही  त्यांच्यासोबत  आला होता. पुजारी काम करीत असताना तो बाहेर खेळत होता. तेथे लोंबकळणाऱ्या उच्च वीज वाहिनीचा धक्का बसल्याने तो गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले होते . तेथे उपचारादरम्यान रविवारी तो मरण पावला. भारती विद्यापीठ पोलिसांकडे यासंदर्भात नोंद करण्यात आली आहे.
कात्रज परिसरात राजीव गांधी पंपिंग स्टेशन ते गोकुळनगरकडे जाणारी २२ केव्ही उच्च दाब वाहिनी खासगी  सोसायटीच्या सीमा भिंतीनंतर गार्डनमध्ये अनेक दिवसांपासून लोंबकळत आहे. त्याकडे महावितरणचे दुर्लक्ष झाल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.