पुणे: इंदापूर येथून 9 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पकडले

मुबारक अंसारी
पुणे, दि.25 मे 2021: पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने 9 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला इंदापूर येथून पकडले.

पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेस पाहिजे फरार आरोपीचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शाखेचे एक विशेष पथक पुणे सोलापूर रसत्यावर पेट्रोलिंग करत असताना, या पथकास गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितद्वारे इंदापूर येथील डिकसळ गाव फाट्याजवळ एक संशयित व्यक्ती आढळला. त्यास नाव आणि पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव किरण प्रल्हाद काळे, वय 26 वर्षे (रा डिकसळ, ता. इंदापूर) असे सांगितले.

या नावावरून फरारी यादीतील माहिती घेतली असता, संबंधित व्यक्ती दौंड पोलिस स्टेशनमधील एका गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या आरोपीस ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच पुढील तपासासाठी त्या आरोपीला दौंड पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे,
पोलिस हवालदार रविराज कोकरे, अनिल काळे, पोलिस नाईक अभिजित एकशिंगे, विजय कांचन, पोलिस कॉन्स्टेबल धिरज जाधव,दगडू विरकर यांनी केली आहे.