पुणे: बलात्काराच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे, २६/११/२०२२: बलात्काराच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीने हडपसर पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली.

आत्महत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी अमोल राजू क्षीरसागर (वय २५, रा. बाँबे गॅरेजसमोर पदपथ, लष्कर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वानवडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी प्रशांत जामदार यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. क्षीरसागर याच्या विराेधात नुकताच एका तरुणीवर बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती. हडपसर पोलीस ठाण्यातील कोठडीत त्याला ठेवण्यात आले होते. त्याने कोठडीतील भिंतीवर तसेच गजावर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याने पोलिसांनी त्याला तातडीने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

ससून रुग्णालयात त्याला बंदोबस्तात उपचारांसाठी पाठविण्यात आले होते. त्या वेळी प्रसाधनगृहात जाण्याची बतावणी त्याने बंदोबस्तावरील पोलीस कर्मचारी जामदार यांच्याकडे केली. क्षीरसागरने प्रसाधनगृहातील खिडकीची काच गळ्यावर मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के तपास करत आहेत.