September 11, 2025

Pune: भारती विद्यापीठ परिसरात अतिक्रमणावर कारवाई; २,२०० चौरस फूट जागा मुक्त

पुणे, दि. १० जुलै २०२५: धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत पी.आय.सी.टी मेन गेट ते भारती विद्यापीठ बॅक गेट दरम्यान पदपथ, इमारत फ्रंट व साईड मार्जिनवर झालेल्या अनधिकृत कच्च्या-पक्क्या बांधकामांवर महापालिकेच्या बांधकाम विकास व अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून संयुक्त कारवाई करण्यात आली.

नागरिकांच्या वारंवार तक्रारी आणि वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई उपआयुक्त (अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन) संदीप खलाटे, उपआयुक्त परिमंडळ क्र. ३ विजयकुमार थोरात आणि सहाय्यक आयुक्त सुरेखा भनगे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

या कारवाईत २,२०० चौरस फूट कच्चे-पक्के बांधकाम हटवण्यात आले. याशिवाय, ३ हातगाड्या, २२ लोखंडी काऊंटर, ६ स्टील काऊंटर, टेबल-खुर्च्या, टेंट, १६ झोपड्या आणि इतर साहित्य असा एकूण १० ट्रक भर माल जप्त करण्यात आला.

कारवाईत विभागीय अधिकारी नारायण साबळे, निरीक्षक भिमाजी शिंदे, सागर विभूते, कनिष्ठ अभियंता वंदना गवारी यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी, ४ पोलीस, २१ महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान आणि ४५ बिगारी कर्मचारी सहभागी झाले होते.

महापालिकेने अशी कारवाई पुढील काळातही सातत्याने सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.