पुणे: रस्ते खोदाई वरून प्रशासनाची झाडाझडती, अधिकाऱ्यावर दिली रस्त्याची जबाबदारी

पुणे,१०/०६/२०२१: शहरातील खोदण्यात आलेल्या मुख्य रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण व्हावीत यासाठी प्रत्येक रस्त्यासाठी स्वतंत्र अभियंत्याची नियुक्ती करावी. या अभियंत्यावर संबंधित रस्त्यावर सुरू असलेल्या कामाची जबाबदारी द्यावी, अशा सूचना महापालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांनी शुक्रवारी दिल्या. घाईगडबडीमध्ये खोदण्यात आलेल्या रस्त्यांचे पुर्नडांबरीकरण (रिसर्फेसिंग) करू नये, असेही बिडकर यांनी दिल्या.

शहरातील मुख्य रस्त्यांवर गेल्या काही दिवसांपासून कामे सुरू आहेत. पालिकेचा पाणीपुरवठा विभाग, ड्रेनेज विभाग यांच्या माध्यमातून २४ बाय ७, पावसाळी गटारे तसेच ड्रेनेज लाईन टाकण्याची कामे सुरू आहेत. यासाठी शहरातील अनेक मुख्य रस्ते खोदण्यात आलेले आहेत. या रस्त्यांची कामे १० जून पर्यंत पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन पालिका प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र अद्यापही अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झालेली नाहीत. शहरातील अनेक रस्ते खोदलेल्या स्थितीत असल्याने वाहनचालकांना तसेच नागरिकांना येथून ये-जा करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यांची कामे सुरू असल्याने वाहनांच्या रांगा लावून वाहतुकीची कोंडी ही निर्माण होत आहे. ही कामे नक्की कधी पूर्ण होणार असा प्रश्न विविध स्तरातून विचारला जात आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सभागृह नेते बिडकर यांनी शुक्रवारी बैठक घेतली. यावेळी महिला व बालकल्याण विभागाच्या अध्यक्ष रुपाली धाडवे, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, ड्रेनेज विभागाच्या सुष्मिता शिर्के यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पालिकेच्या विभागाच्या वतीने कामासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांची कामे नक्की कधी पूर्ण होतील, याची माहिती देणारे फलक पथ विभागाने तेथे लावले पाहिजेत. तसेच ही कामे करणे किती गरजेची आहेत. यामुळे नक्की काय फायदा होणार आहे, याची माहिती स्थानिक नागरिकांना देत त्यांची जनजागृती करावी. तीन विभागांकडून रस्ते खोदण्यात आले असल्याने या कामांमध्ये समन्वय राहावा यासाठी पथ विभागाने प्रत्येक रस्त्यासाठी स्वतंत्र अभियंता नेमावा. या अभियंत्याने आवश्यकता समन्वय ठेवत हे काम कमीत कमी वेळेत पूर्ण करावे अशा सूचना या बैठकीत करण्यात आल्या.
शहरातील कुमठेकर रस्ता असेल बाजीराव रस्ता असेल यात प्रामुख्याने १९७५ साली पाणीपुरवठा तसेच ड्रेनेज यांची कामे झाली होती लाईन इतक्या वर्षानंतरही बदलण्यात आलेल्या नव्हते. गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण वाढल्याने या ड्रेनेज लाईन आणि जलवाहिन्या यांच्यावर मोठा पाणी येत आहे. या रस्त्यांवर ची कामे चालू आहे ही कामे पूर्ण झाल्यानंतर या शहरांना नक्की काय मिळणार आहे याचाही विचार नागरिकांनी केला पाहिजे. सध्या काम सुरू असल्यामुळे थोड्याफार प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे ही वस्तुस्थिती असली तरी ही कामे पूर्ण झाल्यानंतर अनेक एक प्रश्न निश्चितपणे मार्गी लागण्यास मदत होणार आहे असा विश्वास सभागृह नेते बिडकर यांनी व्यक्त केला.

“शहरातील ज्या मुख्य रस्त्यांची कामे अद्यापही अर्धवट आहेत. तेथील वाहतूक दुसऱ्या रस्त्याने वळवून रस्त्यांची कामे दिवस-रात्र सुरू ठेवून पूर्ण करावे. सध्या सुरू असलेल्या या कामांमुळे थोडा त्रास सहन करावा लागत असला तरी पुढील काळात नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे” गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महापालिका

रस्ता जबाबदार अधिकारी
टिळक रस्ता – अतुल कडू
बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता – सुनील पाटील
कवठेकर, केळकर रस्ता – तुळशीदास भांडारकोठे
शिवाजी रस्ता – विकास मोळावडे