पुणे: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची सोमवारी बैठक घेतली

पुणे, ३०/०८/२०२१: गेल्या वर्षी गणेशोत्सवानंतर वाढलेली करोना बाधितांची संख्या लक्षात घेता यावर्षी करोनाची संभाव्य तिसरी लाट निदर्शनाला आली तर महापालिकेला कडक निर्बंध लागू करावेच लागणार आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची सोमवारी बैठक घेतली. यामध्ये लहान मुलांच्या आरोग्याविषयीच्या प्रामुख्याने सूचना देण्यात आल्या.

सप्टेंबर महिन्याच्या मध्यावधीत किंवा गणेशोत्सवाच्या सुमाराला करोनाच्या तिसऱ्या लाटेचे भाकीत करण्यात आले आहे. त्यामुळे केंद्रसरकारपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थेपर्यंत सगळेच कामाला लागले आहेत. त्यामुळे बेड व्यवस्थापन, औषधे आणि अन्य उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागालाही महापालिका आयुक्तांनी सोमवारी बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत. त्याविषयी अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी माहिती दिली.

विविध रुग्णालयातील इन्फ्रास्ट्रक्‍चरचे काम वेळेत पूर्ण करणे, ऑक्‍सिजन प्लान्ट अद्ययावत करणे, त्यांचे राहिलेले काम पूर्ण करा, अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्याचे बिनवडे यांनी सांगितले.

शिवाजीनगर येथील जंबो केअर सेंटरचेही स्ट्रक्‍चरल ऑडिट झाले असून, ते 12 जानेवारी 2022 पर्यंत ते सुरू ठेवता येणार आहे, गरज पडल्यास तेही कमी कालावधीत सुरू करण्याची तयारी महापालिकेची आहे, असे बिनवडे यांनी सांगितले.

“आयसीएमआर’च्या सूचनेप्रमाणे बेडचे व्यवस्थापन केले जात आहे. बहुतांश तयारी झाली असून, ऑक्‍सिजन बेडचे व्यवस्थापन यामध्ये महत्त्वाचे असल्याचे बिनवडे यांनी नमूद केले.

सिंहगड रस्ता, धनकवडी अशा ज्या भागामध्ये बाधितांची संख्या वाढत आहे, तेथे लक्ष केंद्रीत करून कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग आणि लसीकरण वाढवा अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या होत्या. त्यानुसार ते सुरू केले आहे, अशी माहिती महापालिका आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांनी दिली.