पुणे, ४ जुलै २०२०: समाविष्ट गावांचा नियोजनबद्ध विकास व्हावा. तसेच स्थानिक तरुणांना महापालिका सेवेत भरतीसाठी प्राधान्य दिले जावे, अशा विविध मागण्या समाविष्ट गावातील लोकप्रतिनिधीनी केल्या.
पुणे शहराच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांमधील नागरिकांच्या ‘आशा आणि अपेक्षा’ या विषयावर खडकवासला येथील भैरवनाथ विठ्ठल मंदिरात आज सर्वपक्षीय संमेलन पार पडले.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने संदीप खर्डेकर, खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष सचिन मोरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, मनसे’चे वसंत मोरे, रुपाली ठोंबरे- पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, 34 गावांसाठी स्थापन झालेल्या कृती समिती चे निमंत्रक श्रीरंग चव्हाण, सरपंच सौरभ मते, माजी जि.प सदस्य विलास मते, अशोक मते, पराग मते यासह अनेक मान्यवर व विविध गावचे सरपंच आणि 23 गावातील लोकप्रतिनिधी ह्या चर्चासत्रास उपस्थित होते.
यावेळी गावकऱ्यांनी सर्वपक्षीय नेत्यांकडे त्यांच्या अपेक्षा व्यक्त करताना गावांमध्ये रस्ते, पाणी, कचरा, ड्रेनेज व इतर दैनंदिन समस्या सोडविण्यावर भर द्यावा व त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करावा, गावांमधून कर रूपाने मिळणारा निधी गावांसाठीच खर्च केला जावा, पूर्वी झालेल्या बांधकामांवर सरसकट हातोडा चालविला जाऊ नये व त्या भयाखाली नागरिकांची पिळवणूक होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.
तर गावकऱ्यांच्या विविध मागण्या लक्षात घेत, समाविष्ट गावांच्या नियोजनबद्ध विकासासाठी पुणे मनपातील सत्ताधारी भाजप पक्ष कटीबद्ध असल्याचे खर्डेकर यांनी सांगितले. यासाठी लवकरच गावकरी आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि इतर पदाधिकारी यांची भेट घडवून आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
More Stories
रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड’ च्या अध्यक्षपदी अमोल कागवडे ; पदग्रहण समारंभ संपन्न
मिळकतींची माहिती देताना लपवाछपवी
पुणे: डेक्कनमधील सराईत वर्षभरासाठी तडीपार