पुणे, २८/०५/२०२५: अमनोरा सिटी कॉर्पोरेशनने पोलीस दलाला दिलेल्या नऊ वाहनांमुळे पोलिसांची कार्यक्षमता वाढीस लागण्यास उपयोग होणार आहे. पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटीबद्ध आहे. पुण्यातील वाहतूक प्रश्नासह महिला सुरक्षा, रस्त्यांवरील गैरप्रकार, अनधिकृत फेरीवाले यांच्यावर कारवाई करून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज दिली.
सिटी कॉर्पोरेशन लि. (अमनोरा) यांनी सी. एस. आर. फंडामधून पुणे शहर पोलीस दलास नऊ चारचाकी वाहने (किया कॅरेन्स) रितसर खरेदी प्रक्रिया राबवून पोलीस दलाकडे सुपूर्द केली. वाहने हस्तांतरणाचा सोहळा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या उपस्थितीत आज (दि. 28) अमनोरा पार्क टाऊन क्लब, हडपसर येथे आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. सिटी कॉर्पोरेशन लि. (अमनोरा)चे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांनी वाहनांच्या चाव्या पोलीस आयुक्तांकडे या वेळी सुपूर्द केल्या. आदित्य देशपांडे, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
स्वागतपर प्रास्ताविकात अनिरुद्ध देशपांडे यांनी अमनोराच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, महिलांचे सबलीकरण, पाणी बचतीचा संदेश, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रात कार्य केले जात आहे. आरोग्य उपक्रमांतर्गत 1200 महिला पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. अमनोरा येथील घरेलु कामगार महिलांना (अवंतिका) पाणी बचतीचे महत्त्व पटवून देण्यात आले असून येत्या वर्षभरात शंभर कोटी लिटर पाणी बचतीचा संकल्प करण्यात आला आहे. खामगाव येथे पारधी मुलांच्या शाळेची जबाबदारी घेण्यात आली असून तेथील 150 विद्यार्थ्यांना कौशल्यविकास उपक्रमाअंतर्गत प्रशिक्षित करण्यात आले असून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. ते पुढे म्हणाले, शहर सुरक्षेसाठी पोलीस दल सतत कार्यरत असते. यात महिला पोलीस शक्तीचा मोठा वाटा आहे. त्यांच्या सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी महाराष्ट्रात प्रथमच पोलीस दलात किया कॅरेन्स ही वाहने उपलब्ध करून दिली आहेत.
महिला पोलीस सारथ्य करत असलेल्या नऊ किया कॅरेन्सला पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अनिरुद्ध देशपांडे, आदित्य देशपांडे हिरवा झेंडा दाखविला व वाहने पोलीस दलात सामिल करून घेण्यात आली.
अमितेश कुमार पुढे म्हणाले, पुण्यासारख्या सातत्याने विस्तारित होणाऱ्या शहरात नागरिकांच्या सुरक्षेसाठी कार्य करणे अवघड आहे; परंतु तंत्रज्ञान, मनुष्यबळ यांच्या मार्फत नागरिकांचे सुरक्षा, वाहतूकप्रश्न सोडण्यासाठी पोलीसदल कटीबद्ध आहे. नागरिकांनी आमच्या कामास सहकार्य करून सहभागही नोंदविल्यास पोलीस दलाची कार्यक्षमता वाढण्यास तसेच शहराला शिस्त लागण्यास मदत होईल.
नागरिकांनी मोकळेपणाने आपल्या अडचणी आणि प्रश्न 112 या क्रमांकावर पोलीस विभागाकडे मांडावे. प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत पाठपुरावा करत रहावा. आम्ही त्याचे कायमस्वरूपी निराकरण करण्याचा प्रयत्न करू. या परिसरात रस्त्यावर, पादचारी मार्गांवर स्पिकरवर मालाचा भाव सांगत, आरडाओरडा करून वस्तूंची विक्री करणारे फेरीवाले पाहण्यात आले. अशा प्रकारे रस्तेवाहतूक आणि नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या विक्रेत्यांवर योग्य ती कारवाई करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
सूत्रसंचालन स्नेहल जाधव, तहसीन बेग यांनी केले तर आभार डॉ. राजकुमार शिंदे यांनी मानले.

 
                                                                             
                                                                             
                                                                             
                                                                             
                                                                             
                 
                                         
                                         
                                         
                                        
More Stories
Pune: तबलावादन आणि गायनाने युवा तालचक्र महोत्सवाला सुरुवात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘इंडियाज रोडमॅप टू ग्लोबल लीडरशीप इन ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग’ चे प्रकाशन
‘पुणे ग्रॅण्ड टूर २०२६’च्या बोधचिन्हाचे आणि जर्सीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण