September 10, 2025

Pune: जल्लोषात अनंत चतुर्दशी मिरवणुकीला सुरुवात

पुणे, ६ सप्टेंबर २०२५: “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…” अशा घोषणांनी, ढोल-ताशांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात अनंत चतुर्दशीची विसर्जन मिरवणूक शनिवारी सकाळी दणक्यात सुरू झाली. महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीचा शुभारंभ झाला. यावेळी पालकमंत्री अजित पवार, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मानाचा पहिला कसबा पेठ गणपती पारंपरिक पालखीतून मार्गस्थ झाला. भक्तांच्या जल्लोषात पालखी मंडईतून लक्ष्मी रस्त्याकडे मार्गक्रमण करू लागली. पारंपरिक पद्धती, ढोल-ताशांचा निनाद आणि गणेशभक्तांच्या गजरात कसबा गणपतीचे स्वागत झाले.

यानंतर मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळाचा गणराय शिव-पार्वती फुलांच्या रथात विराजमान होऊन मंडईत दाखल झाला. नगरकर बंधूंच्या सनई-चौघड्याच्या निनादात, नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या तालात आणि अश्वराज बँडच्या गजरात वातावरण भारून गेले. शिव-पार्वतीच्या देखण्या रथाने मंडई परिसराला वेगळेच आकर्षण प्राप्त करून दिले.

मानाचा चौथा गणपती तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टचा होता. या मंडळाचा यंदाचा उत्सव विशेष ठरला कारण ट्रस्टच्या स्थापनेला १२५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने तुळशीबाग गणपतीला मयूर रथातून मंडईत आणण्यात आले. या रथाची रचना पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. ३५ फूट उंच, १६ फूट रुंद आणि २४ फूट लांब असा हा भव्य रथ होता. हायड्रोलीक पद्धतीचा वापर करून बनवलेल्या रथावर फुलांची मोहक सजावट करण्यात आली होती. रथाच्या प्रवेशावेळी लोणकर बंधूंच्या नगारा वादनाने आणि शंखनादाने परिसर दुमदुमून गेला.

मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती पारंपरिक पालखीत विराजमान होऊन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाला. या मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत श्रीराम, शिवमुद्रा आणि स्वराज्य ट्रस्ट ढोल-ताशा पथकांचा उत्साही सहभाग होता. बिडवे बंधूंचे नगारा वादन, इतिहासप्रेमी मंडळाचा ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधी जीर्णोद्धार’ हा देखावा, तसेच कथकली मुखवट्यांनी सजलेला रथ यामुळे मिरवणुकीत वेगळेच रंग भरले. स्वराज्य ट्रस्ट ढोल-ताशा पथकाची ‘हरवलेला पोस्टमन’ ही अनोखी संकल्पनाही विशेष आकर्षण ठरली.

ढोल-ताशांचा निनाद, फुलांचा वर्षाव, बँडच्या तालावर थिरकणारे भाविक आणि “गणपती बाप्पा मोरया”चा अखंड गजर यामुळे पुण्याची अनंत चतुर्दशी मिरवणूक नेहमीप्रमाणेच उत्साह, भक्ती आणि जल्लोषात पार पडली.