पुणे, ४ जुलै २०२५: सुधागड वन्यजीव अभयारण्यातील अंधारबन नेचर ट्रेल आणि कुंडलिका व्हॅली ही पर्यटनस्थळे पर्यटकांच्या अनियंत्रित गर्दीमुळे पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश वन विभागाने दिले आहेत.
वनपरिक्षेत्र अधिकारी सुधागड आणि सहायक वनसंरक्षक (वन्यजीव) फणसाड यांनी केलेल्या सूचनेनुसार, या भागात पर्यटकांच्या वाढत्या उपस्थितीमुळे वन्यप्राणी आणि त्यांचा अधिवास धोक्यात येत आहे. तसेच, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळे बंद करण्यात आल्याने अंधारबन येथे पर्यटकांची संख्या अधिक प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.
वन विभागाकडे असलेल्या मर्यादित मनुष्यबळामुळे गर्दी नियंत्रित करण्यात अडचणी येत असून, वन्यजीवांचे रक्षण आणि पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खालील निर्णय घेण्यात आले आहेत:
1. अंधारबन नेचर ट्रेल आणि कुंडलिका व्हॅली ही दोन्ही ठिकाणे पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद राहतील.
2. ही ठिकाणे अभयारण्य क्षेत्रात येत असल्याने विनापरवाना प्रवेश पूर्णतः प्रतिबंधित करण्यात आला आहे.
3. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा संघटनांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम, 1972 मधील कलम 51 अन्वये कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
वन विभागाने पर्यटकांना सहकार्य करण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

More Stories
पुणेकरांसाठी वाहतुकीचा दिलासा; हडपसर–सासवड मेट्रो मार्गांना मंजुरी
Pune: वीस दिवसांत तीन बळी, शेवटी नरभक्षक बिबट्याचा अंत!
Pune: पदवीधर-शिक्षक मतदार नोंदणीसाठी ६ नोव्हेंबरपर्यंत मुदत : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी