September 12, 2025

Pune: कोथरूडमध्ये आणखी एक रस्ता हायवेला जोडणार

पुणे, ४ जून २०२५: कोथरूडमधील एकलव्य महाविद्यालयापासून कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गाकडे जाण्यासाठी नवा रस्ता उपलब्ध होणार आहे. येथील विकास आराखड्यात (डीपी) प्रस्तावित १५ मीटर रुंद रस्त्यासाठीच्या भूसंपादनातील शेवटचा अडथळा दूर झाला आहे. येथील सुमारे दोन गुंठे जागा ताब्यात आल्याने पालिकेने तेथे रस्ता विकसनाचे काम सुरू केले आहे.

कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, आशिष गार्डन येथून गुरुगणेशनगर, सूरजनगर, कुंबरे पार्क, एकलव्य महाविद्यालयापर्यंत डीपी रस्ता आहे. हा १५ मीटर रुंदीचा रस्ता एकलव्यपासून पुढे बाह्यवळण मार्गाला मिळणे प्रस्तावित होते. मात्र, येथील भूसंपादनाअभावी हा रस्ता दीर्घकाळ प्रलंबित राहिला होता. अखेर आता बांदल कुटुंबीयांची दोन गुंठे जागा ताब्यात आल्याने या रस्त्याच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे.

‘बांदल कुटुंबीयांची जागा नुकतीच पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात आलेली आहे. त्यामुळे हा पूर्ण लांबीचा रस्ता विकसित करण्यातील एकमेव अडथळा दूर झाला असून येत्या काही दिवसात रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम केले जाईल,’असे महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरूद्ध पावसकर यांनी सांगितले. या रस्त्यामुळे मुख्य पौड रस्त्यावरून किंवा महात्मा सोसायटीतील अंतर्गत रस्त्यावरून बाह्यवळण मार्गाला जाण्यासाठी नवा पर्याय उपलब्ध होईल. त्यामुळे नागरिकांची सोय होईल आणि या दोन रस्त्यांवरील वर्दळ कमी होईल,’असेही त्यांनी सांगितले.