पुणे: जिल्हा परिषदेत अनुकंपा पदभरती प्रक्रियेव्दारे ३३ उमेदवारांची नियुक्ती

पुणे, ५ जुलै २०२१: जिल्हा परिषदेत डिसेंबर २०२०-२०२१ या वर्षातील विविध संवर्गातील एकूण रिक्त पदांच्या २०% पदे अनुकंपा तत्त्वावर नियुक्त करण्यासाठीची भरती प्रक्रिया व पदस्थापना प्रक्रिया सामान्य प्रशासन विभागामार्फत राबविण्यात आली.


या भरती आणि पदस्थापना प्रक्रियेसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित विभागांचे विभागप्रमुख व सामान्य प्रशासन विभागातील कर्मचारी वर्ग उपस्थित होता.


प्रथम सत्रात प्रतिक्षा सूचीवरील उमेदवारांना ज्येष्ठता क्रमानुसार त्यांनी धारण केलेल्या शैक्षणिक आर्हतेनुसार पात्र होत असलेल्या पदासाठीचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले व त्यांच्या स्वेच्छेने त्या पदावर पदस्थापना देण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. याअंतर्गत कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) ०६, कनिष्ठ सहाय्यक (लेखा) १, वरिष्ठ सहाय्यक (लेखा) १, औषध निर्माण अधिकारी 9, आरोग्य सेवक (पुरुष) ६, आरोग्य सेवक (महिला) – १. ग्रामसेवक (कंत्राटी)- ७. अंगणवाडी पर्यवेक्षिका १. पशुधन पर्यवेक्षक – १, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ६, कनिष्ठ अभियंता २ अशी एकूण ३३ पदे भरण्यात आली.


दुसऱ्या सत्रात अनुकंपा नियुक्ती देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना पदस्थापना देण्यासाठीची प्रक्रिया समुपदेशन प्रक्रियेद्वारे पार पडली. भरती प्रक्रियेमध्ये नियुक्त उमेदवारांना जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले.