पुणे: शाळेतून मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न..!

पुणे, २४/०८/२०२२: खडकीतील महिलेने शिक्षकांना आपण मुलीची आत्या असल्याचे सांगून ५ वर्षे मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. परंतु, त्याचवेळी शाळेत मुलीचा पालक आल्याने या अपहरणाचा डाव फसला व तिला पालक व नागरिकांनी पकडले.

 

छाया युवराज शिरसाठ (वय २८, रा. अकोला) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. हा प्रकार मंगळवारी सकाळी ११ वाजता घडला. याबाबत खडकी पोलीस ठाण्यात ३५ वर्षीय नागरिकाने तक्रार दिली आहे.

 

आरोपी महिला ही मुळची अकोल्याची असून, ती मानसिक ग्रस्त आहे. मध्यरात्री ती एका सोसायटीत शिरली अन तेथील एका घराची बेल वाजविली. तर, त्यांना तुमच्याकडे काम असल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी सुरक्षारक्षकाला बोलावून तिला बाहेर काढले होते. त्यानंतर ती मंगळवारी सकाळी खडकीतील एका शाळेत गेली.

 

दरम्यान, तक्रारदार यांची ५ वर्षाची मुलगी युकेजीच्या वर्गात शाळेत शिकते. शाळा सुटल्यावर तिला आणण्यासाठी ते शाळेत जात असतात. नेहमीप्रमाणे ते मुलीला आणण्यास शाळेत गेले. त्यावेळी महिलेने शाळेतील शिक्षकांना आपण मुलीची आत्या आहे, असे सांगून मुलीच्या हाताला धरुन तिला घेऊन जात असल्याचे आढळून आले. पण, सुदैवाने ते वेळेवर शाळेत गेल्याने पुढील अनर्थ टळला. त्यांनी मुलीला घेत या महिलेकडे विचारपूस सुरू केली. त्यानंतर शिक्षक व इतर पालक जमा झाले. त्यांनी या महिलेला पकडून पोलिसांना घटनेची माहिती दिली. तत्काळ खडकी पोलिसांनी येथे धाव घेत तिला ताब्यात घेतले. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक कदम तपास करीत आहेत.