October 22, 2025

पुणे: डेक्कन मेट्रो स्थानकासाठी पादचारी पूल बांधणी सुरू झाल्याने भिडे पूल वाहतुकीसाठी दीड महिना बंद

पुणे, १८ एप्रिल २०२५: पुण्याच्या मध्यवर्ती भागातील भिडे पूल २० एप्रिल मध्यरात्रीपासून ६ जून पर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या काळात मुळा नदीवरील या पूलावर डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकाला पेठ भागाशी जोडणारा पादचारी पूल बांधला जाणार आहे. पूलाच्या बांधकामामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतला आहे. मात्र, पुलाखालचा नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला राहणार आहे.

या पादचारी पूलामुळे नारायण पेठ, शनिवार पेठ, लक्ष्मी रस्ता भागातील रहिवासी आणि विद्यार्थी डेक्कन मेट्रो स्थानकावर सहज आणि सुरक्षितपणे ये-जा करू शकतील. पुणे मेट्रो प्रशासनाने या कालावधीत नागरिकांनी लकडी पूल, बालगंधर्व पूल आणि झेड ब्रिज या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. पुणे मेट्रोने होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगीर व्यक्त केली असून, पूलाचे काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.